डेल्टा स्ट्रेनच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १२० आरएनए सॅम्पल पाठविले दिल्लीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:45+5:302021-06-22T04:13:45+5:30
अकोला : कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे, मात्र सोबतच तिसऱ्या लाटेच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच राज्यातील ...
अकोला : कोविडची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे, मात्र सोबतच तिसऱ्या लाटेच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील १२० पॉझिटिव्ह आरएनए सॅम्पल नवी दिल्ली येथील ‘आयजीआयबी’ लॅबमध्ये पाठविण्यात आले. अकोल्यातील १२० आरएनए पॉझिटिव्ह सॅम्पल पाठविण्यात आले असून, डेल्टा स्ट्रेनची तपासणी केली जाणार आहे. कोरोना विषाणू स्वत:मध्ये बदल घडवून आणत असल्याने विषाणूचे विविध प्रकार आढळून येत आहेत. यातील काही प्रकार घातक ठरत असून रुग्णांची अवस्था अतिशय गंभीर होत आहे. अशातच तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या लाटेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोविडच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये या डेल्टा व्हेरिअंट आहे की नाहीत, याचा तपास करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून १२० आरएनए सॅम्पल दिल्ली येथील ‘जीनोमिक्स ॲण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी इंस्टिट्यूट’मध्ये पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. अकोल्यातीलही १२० आरएनए सॅम्पल दिल्ली येथे पाठविण्यात आल्याची माहिती, अकोल्यातील व्हीआरडीएल लॅबच्या तज्ज्ञांनी दिली. आरोग्य यंत्रणेला अद्यापही या अहवालाची प्रतीक्षा आहे.
दर महिन्याला पाठविले जाणार सॅम्पल
कोविड पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाचे आरएनए सॅम्पल दर महिन्याला ‘आयजीआयबी’ लॅबमध्ये पाठविले जाणार असल्याची माहिती आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून सुमारे १२० आरएनए सॅम्पल पाठविले जाणार आहेत.
१५ दिवसांपूर्वीच पाठविले अकोल्यातून सॅम्पल
जिल्ह्यातील १२० पॉझिटिव्ह रुग्णांचे आरएनए सॅम्पल १५ दिवसांपूर्वीच दिल्लीस्थित ‘आयजीआयबी’ लॅबमध्ये पाठविण्यात आले. या सॅम्पलचा अहवाल अद्यापही सर्वोपचार रुग्णालयाला प्राप्त झालेला नाही.
खबरदारी आवश्यकच
जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असल्याचे निदर्शनास येत आहे, मात्र दिल्ली येथे पाठविण्यात आलेल्या आरएनए सॅम्पलमध्ये काेविडचा डेल्टा व्हेरिअंट आढळल्यास अकोल्यास राज्यासाठी धोक्याची घंटा असेल. त्यामुळे अकोलेकरांनी आताच खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.