दोन दिवसांत १,२१२ नवीन मतदारांची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:48+5:302020-12-14T04:32:48+5:30
अकोला : मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शनिवार व रविवार या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या ...
अकोला : मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शनिवार व रविवार या दोन दिवसांत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात १ हजार २१२ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १२ व १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अकोट, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांतील १ हजार ६८० मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेच्या दोन दिवसांत जिल्ह्यात १ हजार २१२ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी मतदारांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) अर्ज सादर केले. याशिवाय मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी ९०६ अर्ज, ठिकाणात बदल करण्यासाठी ५६४ अर्ज आणि नावात दुरुस्ती करण्यासाठी २० मतदारांनी ’बीएलओं’कडे अर्ज सादर केले आहेत.