ग्रामीण भागातील ४९ संस्थात्मक विलगीकरण कक्षांत कोरोनाबाधित १२४ रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:15 AM2021-05-31T04:15:23+5:302021-05-31T04:15:23+5:30
संतोष येलकर............. अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांकरिता २३४ गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण ...
संतोष येलकर.............
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांकरिता २३४ गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यापैकी कार्यरत ४९ संस्थात्मक विलगीकरण कक्षांत १२४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, गृह विलगीकरणातील (होम क्वारंटाईन) रुग्णांकडून नियमांचे पालन होत नसल्याने, ‘होम क्वारंटाईन’ रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण कक्षांत दाखल करून, त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आठवडाभरापूर्वी दिले होते. त्यानुसार २२ मेपर्यंत जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये संबंधित ग्रामपंचायतींमार्फत संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यापैकी कार्यरत ४९ संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये १२४ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. संस्थात्मक विलगीकरण कक्षांत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
स्थापन केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांचे असे आहे वास्तव !
तालुका स्थापन कक्ष कार्यरत कक्ष रुग्ण
अकोला ३५ ३५ ५०
अकोट ०५ ०५ २०
बाळापूर ३४ ०० ००
बार्शीटाकळी १७ ०० ००
मूर्तिजापूर १२१ ०२ १६
पातूर ०२ ०२ ३८
तेल्हारा २० ०२ ००
..............................................................................................
एकूण २३४ ४९ १२४
जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये २२ मेपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींमार्फत संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत ४९ संस्थात्मक विलगीकरण कक्ष कार्यान्वित असून, त्यामध्ये १२४ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- डाॅ. सुरेश आसोले
जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला.
दोन तालुक्यातील विलगीकरण कक्ष केव्हा कार्यान्वित होणार?
जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ३४ गावांमध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यात १७ गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले; मात्र या दोन तालुक्यांत स्थापन करण्यात आलेले विलगीकरण कक्ष अद्याप कार्यान्वित करण्यात आले नसल्याने, स्थापन करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षांत एकही कोरोनाबाधित रुग्ण दाखल नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत स्थापन करण्यात आलेले संस्थात्मक विलगीकरण कक्ष केव्हा कार्यान्वित होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.