अकोला जिल्ह्यातील १२५ वर गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:09 PM2019-03-13T12:09:59+5:302019-03-13T12:10:08+5:30
जिल्ह्यातील १२५ वर गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली असून, त्यांना जिल्ह्यातून तडीपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
- सचिन राऊत
अकोला: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्यातील १२५ वर गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली असून, त्यांना जिल्ह्यातून तडीपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये आणखी काही गुन्हेगारांची वाढ होणार असून, त्या दिशेने पोलिसांचे कामकाज सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा शोध सुरू केला आहे. या युवकांची कुंडली गोळा करण्यात येत असून, त्यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत गालबोट लागणार नाही, यासाठी पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. समाजात तेढ निर्माण करणारे तसेच लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त ठरणाऱ्या तसेच अनुचित प्रकार घडविण्यासाठी तत्पर असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांची पोलिसांनी तपासणी सुरू केली असून, त्यांची गुन्हेगारी पृष्ठभूमी लक्षात घेता त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे, तर ज्या गुन्हेगारांवर किरकोळ गुन्हे आहेत, त्यांच्यावरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून हालचाली सुरू असून, तब्बल १२५ वर गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तींवर लवकरच प्रतिबंधात्मक आणि तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, गालबोट लागू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तीचा शोध घेण्यात आला असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक आणि तडीपारीच्या कारवाईसाठी हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.
‘एलसीबी’कडून रेकॉर्ड तपासणी
स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्हेगारांचे रेकॉर्ड गोळा करून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी एक प्रक्रियाच सुरू असून, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने गुंड प्रवृत्तींची कुंडली गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. १२५ वर गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले असून, आणखी काहींची नावे यादीत वाढणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासण्यात येत आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- कैलास नागरे,
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख, अकोला.