अमरावती विभागात १२.६ मिमी बरसला मान्सूनपूर्व पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 10:58 AM2021-06-07T10:58:44+5:302021-06-07T11:01:26+5:30
Monsoon rains : यावर्षी अमरावती विभागात केवळ १२.६ मिमी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे.
अकोला : गेल्या वर्षी अमरावती विभागात १ ते ६ जूनदरम्यान ३६.२ मिमी मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली होती. यंदा १२.६ मिमी पाऊस झाला. त्या प्रमाणात कमी पावसाची नोंद झाली असून आता शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष लागले आहे. यंदा मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घर, दुकाने व पिकांचे मोठे नुकसान झाले; परंतु जून महिन्यातील सुरुवातीच्या सहा दिवसांमध्ये हे प्रमाण कमी आहे. यावर्षी अमरावती विभागात केवळ १२.६ मिमी मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा कमी पावसाची नोंद झाली. यावेळी सर्वसामान्याच्या तुलनेत ४२.७ टक्के पावसाची नोंद झाली. यंदा मान्सूनची वाटचाल जोराने सुरू आहे. ही बाब शेतकऱ्यांना सुखावणारी असून मान्सून कधी दाखल होतो, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय झालेला मान्सूनपूर्व पाऊस
जिल्हा झालेला पाऊस (मिमी)
बुलडाणा ८.२
अकोला २.५
वाशिम १०.१
यवतमाळ २३.२
अमरावती १०.६
गेल्या वर्षी यवतमाळ व अमरावतीमध्ये सर्वाधिक पाऊस
१ ते ६ जूनदरम्यान सर्वाधिक मान्सूनपूर्व पाऊस अमरावती ४२.१ मिमी व यवतमाळ ५६.५ मिमी जिल्ह्यात बरसला होता. तर यंदाही याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाणात जास्त आहे.