शहरात १२७ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:20 AM2021-05-18T04:20:18+5:302021-05-18T04:20:18+5:30
चाचणीची संख्या घसरली अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात जीवघेण्या काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, काेराेनाची लागण हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
चाचणीची संख्या घसरली
अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात जीवघेण्या काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, काेराेनाची लागण हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशावेळी नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तातडीने काेराेना चाचणी करणे अपेक्षित आहे. साेमवारी शहरात केवळ ९४८ जणांनी चाचणी केली. यामध्ये २१८ जणांनी आरटीपीसीआर तसेच ७३० जणांनी रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली आहे. संबंधितांचे अहवाल तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
‘अमृत’ अभियानचे पाइप उघड्यावर
अकाेला : ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान जलवाहिनी टाकताना रस्त्यालगत किंवा अनेक ठिकाणी रस्त्याचीही ताेडफाेड केली जात आहे. जुने शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्य जलवाहिनीचे पाइप उघड्यावर टाकण्यात आले आहेत. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.
नाला सफाई नाहीच
अकाेला : शहरातील मुख्य नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई न केल्यामुळे नाले घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांची पैदास झाली आहे. दगडी पूल ते सावतराम चाळ येथील मुख्य नाला घाणीने साचला असून, याच्या साफसफाईकडे मनपाने पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.
रस्त्यालगत फळविक्री
अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूला पायबंद घालण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असले तरी खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक, काला चबुतरा गल्ली आदी भागात रस्त्यालगत फळविक्री केली जात आहे.
उड्डाणपुलाचे काम मंदावले
अकाेला : जुने शहरातील डाबकी रेल्वे गेट येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे भिजत घाेंगडे कायम असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अकाेला ते निंबा फाटा, शेगाव, तेल्हारा तसेच संग्रामपूर तालुक्यात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला खाेळंबा निर्माण हाेताे. मध्यंतरी या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचाही आराेप झाला हाेता.
दिंडी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा
अकाेला : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जिल्ह्यात माेठी संख्या आहे. अकाेला ते गायगाव, निमकर्दा, अडाेशी, कडाेशीमार्गे शेगावला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना मागील काही दिवसांपासून दिंडी मार्गाच्या दुरुस्तीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दिंडी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांमधून हाेत आहे.