मनपातील बारा व तेराव्या वित्त आयोग निधीच्या खर्चाची होणार चौकशी!
By Admin | Published: April 14, 2016 02:06 AM2016-04-14T02:06:48+5:302016-04-14T02:06:48+5:30
स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती.
अकोला: अल्पसंख्याक निधी अंतर्गत विहित वेळेत प्रस्ताव सादर न केल्याने निधी परत गेला. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून नियमबाह्य देयके देणे, विनापरवानगी निविदा काढणे, बारा व तेराव्या वित्त आयोगाचा निधी नियमबाह्य पद्धतीने खर्च करण्याच्या मुद्दय़ावरून मनपा स्थायी समितीने नाराजी व्यक्त केली आणि या नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची चौकशी समिती स्थापन केली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ७ एप्रिल रोजी झालेल्या सभेमध्ये बाराव्या, तेराव्या वित्त आयोगाचे अनुदान, रस्ता अनुदान, नगरोत्थान अनुदान अंतर्गत करण्यात आलेल्या नियमबाह्य खर्चाबाबत सभापती विजय अग्रवाल यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले होते. मनपा सभेत निधी खर्चाबाबतचे नियोजन झाले आणि विषय अजेंड्यावर असताना नियमबाह्य खर्च कसा करण्यात आला, स्थायी समितीला विश्वासात का घेण्यात आले नाही, अशी विचारणा स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी केली होती. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले होते. त्यामुळे सभापती विजय अग्रवाल यांनी नियमबाह्य खर्चाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.