बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:22+5:302021-06-05T04:14:22+5:30
परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. ...
परीक्षांबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा घेण्याबाबत राज्य शासन पर्यायांचा विचार करत होते. मे महिना संपत आला, तरी परीक्षा घेण्याबाबत शासनाकडून पर्याय निश्चित होत नसल्याने बारावीचे विद्यार्थी संभ्रमात होते. परीक्षेबाबत लवकर निर्णय घेऊन आमच्यावरील मानसिक तणाव कमी करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून झाली होती. कोरोनामुळे सीबीएसई बारावीची परीक्षा रद्दचा निर्णय बुधवारी झाला. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेदेखील बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दुपारी जाहीर केला. त्यामुळे पुढील पदवीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार, अशी चिंता लागली आहे.
प्राचार्य म्हणतात?
परीक्षा रद्द होणे हे हुशार विद्यार्थ्यांना नुकसानकारक आहे. शासनाने ऑनलाईन व उर्वरित पर्याय निवडायला पाहिजे होते. यावर आता ॲडमिशन कसे द्यायचे, हा मुद्दा उपस्थित होणार आहे. दर्जेदार विद्यार्थी मिळणार आहेत.
- डॉ. रामेश्वर भिसे, प्राचार्य
कोरोनाची परिस्थिती असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य आहे. पुढील प्रवेशासाठी सीईटी मार्ग असल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे धोरण शासनाने लवकर जाहीर करावे.
- दीपक बिरकड, प्राचार्य
विद्यार्थी म्हणतात?
परीक्षा घेतली असती, तर चांगले झाले असते, पण वाढत्या कोरोनामुळे सरकारने परीक्षा रद्दचा घेतलेला निर्णय योग्य वाटतो. आमच्या मूल्यमापनाचे सूत्र लवकर जाहीर करून प्रक्रिया पूर्ण व्हावी.
- धम्मानंद जामनिक, विद्यार्थी
आम्ही वर्षभर अभ्यास केला होता. पण कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली. जून महिना आला तरी परीक्षा होत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ती आता दूर झाली.
- विठ्ठल घोगरे, विद्यार्थी
पालक म्हणतात...
कोरोनाची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पाठविणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. आता पुढील प्रवेशासाठी मूल्यमापन कसे होईल? ही वाट बघत आहे.
- किशोर पाटील
वर्षभरापासून शाळा बंद आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने विद्यार्थ्यांना धोका होता. त्यामुळे परीक्षा न घेणे हा निर्णय चांगला आहे. निकाल कसा लागणार यावर लक्ष आहे.
- विश्वास गवई
बारावीनंतरच्या संधी
बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बारावीनंतर कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतले करिअरचे अनेक पर्याय आहेत.
अभियांत्रिकी क्षेत्र निवडून इंजिनिअर पदवी मिळविता येते. यामध्ये एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, केमिकल, खाण, काॅम्प्युटर शाखांचे पर्याय आहेत.
डॉक्टर बनण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी बहुपर्याय उपलब्ध आहे. यामध्ये एमबीबीएस, बीएचएमएस, दंतचिकित्सा, बीएएमएस, बीयुएमएस, पशुवैद्यकीय सेवा व पशुसंवर्धन या क्षेत्रात संधी आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान या विषयांमध्ये बीए, बी. कॉम., बी. एस्सी. या पदव्यांचे पर्याय आहेत. त्यानुसार कॉम्प्युटर, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित या विषयांची निवड करता येऊ शकते. हॉटेल मॅनेजमेंटचाही पर्याय आहे.
जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी
२४,८०९