१३ लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: March 7, 2017 02:27 AM2017-03-07T02:27:30+5:302017-03-07T02:27:30+5:30
पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई
अकोला, दि. ६- प्रतिबंधित गुटख्याची शिवणी परिसरातून वाहतूक सुरू असताना जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून १३ लाख ५0 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. सदर गुटखा रात्रभर पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात आला असून मंगळवारी सकाळी तो अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात येणार आहे.
राज्यात गत तीन वर्षांपूर्वी गुटखाबंदी करण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही काही ठिकाणांवर गुटखा विक्री सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री शिवणी परिसरात एम एच २७ एक्स ८१८४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गुटख्याचा साठा नेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. यावरून त्यांच्या पथकाने शिवणी परिसरात पाळत ठेवून अमरावतीकडे जात असलेला हा ट्रक पकडला. त्यानंतर यामधील १३ लाख ५0 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटखा १३ लाख रुपयांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली; मात्र अद्याप अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी या गुटख्यासंदर्भात अधिकृत माहिती दिली नाही. मंगळवारी सकाळी हा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात येणार असून त्यानंतर या गुटख्याचा निश्चित आकडा स्पष्ट होणार आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह केली.