६८ जागांसाठी १३ हजारांवर अर्ज!
By admin | Published: March 24, 2017 02:03 AM2017-03-24T02:03:00+5:302017-03-24T02:03:00+5:30
पोलीस भरती; ७0२ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र.
अकोला, दि. २३- जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपायांच्या ६८ पदांसाठी २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गुरुवारी ९९९ उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी ७७0 उमेदवार उपस्थित होते. उपस्थित उमेदवारांपैकी ७0२ उमेदवार शारीरिक चाचणीमध्ये पात्र झाल्याने, त्यांची मैदानी चाचणी घेण्यात आली. यात ६२९ उमेदवार मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले.
पोलीस भरतीदरम्यान कोणतीही गडबड, गोंधळ होऊ नये, या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात असून, बायोमेट्रिक पद्धतीने उमेदवारांची नोंदणी करण्यात येत आहे, तसेच आधार कार्डचीसुद्धा तपासणी करण्यात येत आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची माहिती त्याचक्षणी देऊन त्यांची स्वाक्षरी घेऊन संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकरीत्या पार पाडण्यात येत आहे. सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी सकाळी ११ वाजतापूर्वी पूर्ण करून उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांची माहिती देऊन दुपारी १ वाजता नोटिस बोर्डवर निकाल घोषित करण्यात येत आहे. निकालाची माहिती पोलीस दलाच्या संकेतस्थळावरसुद्धा देण्यात येत आहे.
पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची पडताळणी आधार प्रणालीद्वारे, पॅनकार्ड, वाहन परवाना आदींवरून करण्यात येत असून, उमेदवारांना पोलीस भरतीत प्रवेश देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उमेदवारांच्या बोटांचे ठसे संग्रहित करण्यासाठी दहा बायोमेट्रिक्स मशीनचा वापर करण्यात आहे. पोलीस भरतीत उमेदवारांना शारीरिक इजा झाल्यास, त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची चमू तैनात करण्यात आली आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली भेट
पोलीस भरतीदरम्यान अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि पोलीस भरतीची प्रक्रिया आणि इतर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, मूर्तिजापूरच्या उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे व अकोटचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मनवरे उपस्थित होते.