अकोला परिमंडळातील १३ हजारांवर वीज ग्राहक झाले पर्यावरणस्नेही
By Atul.jaiswal | Published: November 2, 2023 02:44 PM2023-11-02T14:44:54+5:302023-11-02T14:45:11+5:30
वीजबिलासाठी ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रुपयांची, तर वर्षाला १२० रुपयाची सूट देण्यात येते.
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील १३ हजार २५१ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. वीजबिलासाठी ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रुपयांची, तर वर्षाला १२० रुपयाची सूट देण्यात येते.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून पर्यावरणपूरक ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीजबिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय देण्यात येतो. महावितरणच्या पर्यावरणपूरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे वीजबिलामध्ये वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होते. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल, तसेच ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ ऑनलाइनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होते.
बिलाच्या रंगीत प्रिंटचीही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीजबिल मूळ स्वरूपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
‘गो-ग्रीन’ निवडण्यासाठी काय करावे?
महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जी.जी.एन. या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल ॲपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https:// billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी लागणार आहे. याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यांतील मिळून एकूण ५४ हजार २५७ ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात नागपूर परिमंडळातील १९ हजार ७२ ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापाठोपाठ अकोला परिमंडलातील १३ हजार २५१, अमरावती परिमंडळातील १२ हजार ७९, चंद्रपूर परिमंडलातील ५ हजार १३५, तर गोंदिया परिमंडळातील ४ हजार ७३८ ग्राहकांचा समावेश आहे.