चार महिन्यात ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांनी काढले १३ हजार ऑनलाइन दाखले !
By संतोष येलकर | Published: July 29, 2023 05:42 PM2023-07-29T17:42:58+5:302023-07-29T17:43:23+5:30
जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये सात दाखले ऑनलाइन देण्याची सुविधा
- संतोष येलकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवरील विविध प्रकारचे सात दाखले ऑनलाइन पध्दतीने देण्याची सुविधा गेल्या एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली असून, २७ जुलैपर्यंत गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांनी १३ हजार २० दाखले ऑनलाइन काढले आहेत.
गावपातळीवर ग्रामपंचायतीमार्फत विविध सात प्रकारचे दाखले दिले जातात. यापूर्वी ग्रामसेवक व सरपंचांकडून हस्तलिखित स्वरुपात संबंधित दाखले दिले जात होते. त्यासाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतींमध्ये चकरा माराव्या लागत होत्या. दरम्यान, गेल्या १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये ग्रामस्थांना ऑनलाइन दाखले उपलब्ध करून देण्याची सेवा सुरू करण्यात आली. त्यामध्ये २७ जुलैपर्यंत गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींमधून आवश्यकतेनुसार ग्रामस्थांनी १३ हजार २० विविध सात प्रकारचे दाखले ऑनलाइन काढले. ग्रामपंचायतस्तरावरील दाखले झटपट ऑनलाइन मिळत असल्याने, या दाखल्यांसाठी आता ग्रामस्थांना ग्रामपंचायतींमध्ये चकरा मारण्याची आणि प्रतीक्षा करण्याची गरज राहिली नाही.
.......................................
ग्रामपंचायतींमधून ऑनलाइन
काढलेल्या दाखल्यांची संख्या !
तालुका दाखले
अकोला १,४४४
अकोट २,७५५
बाळापूर १,०५६
बार्शिटाकळी २,७३६
मूर्तिजापूर २,२८७
पातूर ८२२
तेल्हारा १,८२०
...............................................
ग्रामपंचायतींमध्ये असे मिळतात
सात ऑनलाइन दाखले !
नमुना ...८
जन्म दाखला
मृत्यू दाखला
विवाह दाखला
शौचालय वापराचे स्वयंघोषणापत्र
रहिवासी दाखला
दारिद्र्यरेषेखालील दाखला
...............................................
तालुकानिहाय ग्रामपंचायती !
तालुका ग्रा. पं.
अकोला ९७
अकोट ८५
बाळापूर ६६
बार्शिटाकळी ८२
पातूर ५७
तेल्हारा ६२
मूर्तिजापूर ८६
.............................................
रेल्वे तिकीट आरक्षणासह
वीज देयक भरण्याची सुविधा !
ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये विविध सात दाखल्यांसह रेल्वे, विमान प्रवासाचे आरक्षण तिकीट आणि वीज देयक भरण्याची सुविधा ऑनलाइन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध झालेल्या या ऑनलाइन सुविधा ग्रामस्थांसाठी सोयीच्या ठरत आहेत.
...........................
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये गेल्या एप्रिलपासून ग्रामपंचायतीमार्फत दिले जाणारे विविध सात प्रकारचे दाखले ऑनलाइन पध्दतीने ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधून ग्रामस्थांनी १३ हजारांंवर दाखले ऑनलाइन पध्दतीने काढले आहेत.
एच. जे. परिहार
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद