अकोला जिल्ह्यातून १,३१९ कामगार परतले स्वगृही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 10:16 AM2020-05-29T10:16:18+5:302020-05-29T10:16:33+5:30
संपूर्ण खर्च प्रशासनाकडून उचलण्यात आल्याचे राज्य परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले.
अकोला: परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या आदेशानंतर अकोला व वाशिम जिल्ह्यातून आतापर्यंत १,३१९ कामगारांना सोडण्यात आले आहे. यासाठी ६८ बसफेऱ्या झाल्यापासून याचा संपूर्ण खर्च प्रशासनाकडून उचलण्यात आल्याचे राज्य परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले.
‘कोविड-१९’मुळे देशभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वकाही ठप्प पडल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. शिवाय, कोरोनाच्या भीतीने परराज्यातील मजूर गावाकडे धाव घेत आहेत. वाहनाची व्यवस्था नसल्याने बहुतांश मजूर शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करीत आहेत. या मजुरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने ६८ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या बहुतांश कामगारांना रेल्वेद्वारे रवाना करण्यात आले आहे. याशिवाय वाशिम आणि अकोला येथील १,३१९ अडकलेल्या मजुरांना ६८ बसेसने सोडण्यात आले.
अकोल्यात अजूनही अनेक कामगार अडकले असले तरी त्यांनाही हळूहळू त्यांच्या गंतव्य स्थानाकडे सोडले जाईल. आतापर्यंत त्यासाठी महामंडळाच्या बसेसनी ३,२५४ किलोमीटरचा प्रवास केला.
तीन राज्यांच्या सीमेवर पोहोचल्या बसेस
अकोल्याच्या बसमधून छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमधील कामगारांना या राज्यांच्या हद्दीत नेण्यात आले. या तीन राज्यांमधून मोठ्या संख्येने कामगार या कामासंदर्भात येतात; पण कुलूपबंद झाल्यामुळे दुकाने, गिरण्या, कार्यालये बंद पडल्यामुळे हे लोक आपल्या राज्यात परत गेले.
कामगारांना ३१ मेची प्रतीक्षा!
जिल्ह्यात अद्यापही अनेक कामगार अडकले आहेत. ३१ मेनंतर सर्वकाही आधीसारखे सुरळीत होईल व आपल्याला रोजगार मिळेल, अशी आशा असल्याने हे कामगार ३१ मेची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु लॉकडाउन वाढविण्यात आल्यास त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागू शकतो.
अशा सुटल्या बसेस
प्राप्त माहितीनुसार ९ मे रोजी कामगारांना बसेस सोडण्याचा आदेश देण्यात आला होता. १० मे रोजी ६ बसेसमधून १३२ प्रवाशांना सोडण्यात आले. ११ मे रोजी २ बसेसमधून ४२ प्रवासी सोडण्यात आले. १५ मे रोजी २ बसेसमधून ४६ प्रवाशांना सोडण्यात आले. १६ मे रोजी ५ बसेसमधून ९८ प्रवाशांना सोडण्यात आले. १७ मे रोजी ७ बसेसमधून १५४ प्रवाशांना सोडण्यात आले. १८ मे रोजी २ बसेसमधून ४९ प्रवाशांना सोडण्यात आले. २० मे रोजी २० बसेसमधून ४३८ प्रवाशांना सोडण्यात आले. २१ मे रोजी २७२ प्रवाशांना सोडण्यात आले.