जिल्हयात १.३२ लाख निराधारांना मिळणार ‘आधार’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:48+5:302021-04-17T04:17:48+5:30
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लाॅकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर निराधार लाभार्थींसाठी राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार ...
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘लाॅकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर निराधार लाभार्थींसाठी राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ७८ लाभार्थी निराधारांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कोरोना काळात निराधारांना या मदतीचा ‘आधार’ मिळणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी राज्यात १४ एप्रिल रोजी रात्रीपासून ‘लाॅकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या पाच योजनांतर्गत लाभार्थींना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत राज्य शासनाने जाहीर केली आहे. या पाचही योजनांतर्गत जिल्ह्यात १ लाख ३२ हजार ७८ लाभार्थींची संख्या असून, या लाभार्थींना प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत मिळणार आहे. त्यामुळे कोरोना संकटात जिल्ह्यातील निराधारांना प्रत्येकी एक हजार रुपयांच्या मदतीचा आधार मिळणार आहे.
योजनानिहाय लाभार्थींची संख्या
संजय गांधी निराधार योजना : ३६९०४
श्रावणबाळ योजना : ७२८४३
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना : २१५३६
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना : ५०५
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना : २९०