स्मशानभूमीत १४ जणांवर अंत्यसंस्कार;  प्रशासनाच्या लेखी चाैघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 10:58 AM2021-04-15T10:58:59+5:302021-04-15T11:02:11+5:30

Corona Death in Akola : शहानिशा केली असता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी, बुधवारी दिवसभरात १२ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

14 cremated in cemetery; officialy only four death | स्मशानभूमीत १४ जणांवर अंत्यसंस्कार;  प्रशासनाच्या लेखी चाैघांचा मृत्यू

स्मशानभूमीत १४ जणांवर अंत्यसंस्कार;  प्रशासनाच्या लेखी चाैघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली. मृत्यू झालेल्या १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली.आकड्यात गौडबंगाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

अकोला : जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून, दररोज रुग्णांचा बळी जात आहे. मात्र, प्रशासनाकडून दर्शविण्यात येणारी मृतकांची संख्या आणि स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्या जाणाऱ्या मृतकांच्या संख्येत बुधवारी लक्षणीय तफावत दिसून आली. ‘लोकमत’ चमूने याची शहानिशा केली असता, मृतकांच्या आकड्यात गौडबंगाल असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले.

जिल्हा प्रशासनाकडून दररोज जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली जाते. त्यानुसार बुधवारी दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली; परंतु दुपारपर्यंत स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत आणि स्मशानभूमीतून मिळालेल्या मृतांच्या आकडेवारीत माेठी तफावत आढळली. या प्रकरणाची ‘लोकमत’ने शहानिशा केली असता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी, बुधवारी दिवसभरात १२ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यापैकी पाच रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील, तर सात रुग्ण जिल्ह्यातील असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली, तसेच एक रुग्ण खासगी रुग्णालयातील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून मिळाली. जिल्हा प्रशासनाकडून मिळणारी माहिती आणि प्रत्यक्षात स्मशानभूमीत होणारे अंत्यविधी या संख्येत तफावत आढळल्याने उर्वरित मृत्यूच्या नोंदीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

काय म्हणतात आकडे !

 

जिल्हा प्रशासन- ४

‘जीएमसी’ प्रशासन- १२

 

रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही!

जिल्ह्यातील अनेक नॉनकोविड रुग्णालयांत केवळ सीटी स्कॅन अहवालाच्या आधारे कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी मृत्यू हाेणाऱ्या काेविड रुग्णांची नोंद होत नसल्याचेही समोर आले आहे.

 

आकडेवारीत तफावत का?

शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती़ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने १४ जणांना मुखाग्नी दिला़ यामध्ये शहरातील दहा तसेच बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील चार मृतदेहांचा समावेश हाेता़ उर्वरित एका मृतदेहावर उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार केला जाणार आहे़ यादरम्यान, ‘जीएमसी’ व जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली मृतांची आकडेवारी अचंबित करणारी असून आकडेवारीत इतक्या माेठ्या प्रमाणात तफावत का, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़

 

काही प्रश्न अनुत्तरित?

मृतांचा आकडा पाहता व जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती लक्षात घेता ‘लाेकमत’ चमूने यातील मृतांच्या नातेवाईकांसाेबत संपर्क साधला़ त्यांनीदेखील मृतदेहांवर बुधवारी अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले़ ‘जीएमसी’ व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मृतांच्या आकडेवारीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत़

काय म्हणतात अधिकारी?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून दिवसभरात दोन टप्प्यांत आकडेवारी प्राप्त होते. त्याच माहितीची नोंद जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत घेतली जाते.

- डॉ. मिलिंद दुसाने, जिल्हा माहिती अधिकारी, अकोला

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून दुपारी ४ वाजेपर्यंतच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाते. त्यानंतर होणाऱ्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी सकाळच्या अहवालात दिली जाते. यामध्ये केवळ जिल्ह्यातील रुग्णांचाच समावेश केला जातो. जिल्ह्याबाहेरील रुग्णाची माहिती संंबंधित जिल्हा प्रशासनाला दिली जाते.

- डॉ. मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.

Web Title: 14 cremated in cemetery; officialy only four death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.