कीटकनाशकांच्या स्टॉकमध्ये १४ लाख ७३ हजारांची अफरातफर

By नितिन गव्हाळे | Published: July 13, 2023 08:04 PM2023-07-13T20:04:01+5:302023-07-13T20:04:09+5:30

एमआयडीसीत दोन गोडावून किपर, एका मार्केटिंग प्रतिनिधीविरूद्ध गुन्हा दाखल

14 lakh 73 thousand fraud in stock of pesticides | कीटकनाशकांच्या स्टॉकमध्ये १४ लाख ७३ हजारांची अफरातफर

कीटकनाशकांच्या स्टॉकमध्ये १४ लाख ७३ हजारांची अफरातफर

googlenewsNext

नितीन गव्हाळे, अकोला : एका कृषी कंपनीने भाड्याने घेतलेल्या गोडावूनमध्ये कीटकनाशकांच्या स्टॉकमध्ये तब्बल १४ लाख ७३ हजार रुपयांची अफरातफर करून कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी तत्कालिन व विद्यमान गोडावून किपर व एका मार्केटिंग प्रतिनिधीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

लक्ष्मी केमिकल प्रा. लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत सूर्यवंशी (६३, रा. आदर्शनगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार लक्ष्मी केमिकल्स प्रा. लि. हा कीटकनाशके प्रक्रिया करण्याचा उद्योग असून, विविध प्रकारची कीटकनाशके, तणनाशके, संजिवके, सेंद्रिय उत्पादने तयार करण्यात येतात. कंपनीने अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक ४ तील वाहतूकनगर येथे गोडावून भाड्याने घेतले आहे. याठिकाणी गोडावून किपर हनमंत संतोष देशमुख मु. पो. कुंभारी हे होते. यापूर्वी अंकुश मोरे हा गोडावून किपर होता, तर अविनाश शेळके हा मार्केटिंग प्रतिनिधी होता.

अंकुश मोरे हा २ एप्रिल २०२० पासून स्टोअर किपर असताना त्याने १,१७४ नग, किंमत ३ लाख ८८ हजार रुपयांची अफरातफर केल्याचे स्टॉक ऑडिटमध्ये आढळून आले. याबाबत हनमंत देशमुख यांना विचारणा केली असता, त्यांनी हिशोब देण्यास टाळाटाळ केली. स्टॉक ऑडिट केले असता स्टॉकमध्ये १० लाख ३० हजार रुपयांचे २,१४६ नग कमी आढळून आले. त्यामुळे कंपनीतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी गोडावूनमधील स्टॉकची सखोल तपासणी केल्यानंतर स्टॉक कमी आढळून आला.

अविनाश शेळके व अंकुश मोरे हे मधून मधून स्टॉकमध्ये अफरातफर करून फसवणूक करीत होते. वारंवार होणाऱ्या फसवणुकीमुळे शेळके यांना अखेर १० डिसेंबर २०२१ रोजी राजीनामा देण्यास सांगितले. त्यानंतरही अंकुश मोरे यांना हाताशी धरून त्यांनी १३८ नगाचा अपहार केला. या प्रकरणात व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्टॉक ऑडिटची कागदपत्रे सादर केल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

तिघेही गोडावूनमध्ये करायचे ओली पार्टी
अविनाश शेळके व अंकुश मोरे यांना कंपनीतून काढून टाकल्यानंतरही त्यांनी गोडावून किपर हनमंत देशमुख यांच्याशी संगनमत केले आणि तिघेही एमआयडीसीतील गोडावूनमध्ये अधूनमधून ओली पार्टी करायचे. तसेच गोडावून किपर देशमुख यांना दारूच्या बाटल्या आणायला सांगून शेळके व मोरे माल गायब करायचे. असाही तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे फोडल्यानंतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ
शेळके व मोरे यांनी कंपनी सोडल्यानंतरही ते एमआयडीसीतील गोडावूनमध्ये यायचे. ऑगस्ट महिन्यात गोडावूनमध्ये असलेला कॅमेरा जाणीवपूर्वक खाली पाडून खराब करण्यात आला. त्यानंतरच स्टॉकमधला फरक वाढत गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

Web Title: 14 lakh 73 thousand fraud in stock of pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.