१४ गावांचा संपर्क तुटला!
By Admin | Published: July 13, 2016 01:58 AM2016-07-13T01:58:31+5:302016-07-13T01:58:31+5:30
अकोला जिल्हय़ातील चार तालुक्यात अतिवृष्टी: नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.
अकोला: अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ात मंगळवारी जनजीवन विस्कळीत झाले. जिल्हय़ात दुसर्या दिवशीही बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, रामगाव ते मुजरे मोहंमदपूर येथील नाल्याच्या पुरात एक जण वाहून गेला.
जिल्हय़ात गत रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळपर्यंंत जिल्हय़ातील पाच तालुक्यात अतवृष्टी झाली होती. मंगळवारीदेखील दिवसभर अधून-मधून पावसाने हजेरी लावली. गत २४ तासात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंंत जिल्हय़ात सरासरी ९३.७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्यामध्ये बाश्रीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यात अतवृष्टी झाली. दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्हय़ातील पूर्णा नदी आणि उपनद्या व नाल्यांना पूर आला. त्यामुळे संबंधित गावांचा मंगळवारी जिल्हय़ाशी संपर्क तुटला होता. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हय़ातील १४ गावांचा संपर्क तुटला असून, संबंधित गावांची रस्ते वाहतूक बंद होती. अतवृष्टी आणि पुरामुळे जिल्हय़ात विविध ठिकाणी घरांची पडझड झाल्याने नुकसान झाले. तर संततधार पावसामुळे जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ातही वाढ झाली. जिल्हय़ात अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने, संबंधित मार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अकोला तालुक्यातील रामगाव ते मुजरेमोहंमदपूर नाल्याच्या पुरात मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास एक जण वाहून गेला. अतवृष्टी व पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ात पावसाने दमदार हजेरी लावल्याने, शेतकरी सुखावला असला तरी, अतवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जिल्हय़ातील विविध भागात पिके पाण्याखाली आली आहेत. पेरलेली पिके उगवल्यानंतर शेतांमध्ये पाणी साचल्याच्या स्थितीत पिके धोक्यात आली. त्यामुळे दुष्काळी संकटानंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.