१४० नवदाम्पत्यांना लग्नात दत्तक दिले रोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 02:56 PM2019-04-28T14:56:16+5:302019-04-28T14:56:56+5:30
अकोला : नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे; मात्र या पारंपरिक पद्धतीला अकोल्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि मित्रमंडळीने फाटा देत वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
- संजय खांडेकर
अकोला : नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत रूढ आहे; मात्र या पारंपरिक पद्धतीला अकोल्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि मित्रमंडळीने फाटा देत वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत या मंडळीने अकोला परिसरातील विविध लग्नसमारंभात जाऊन १४० नवदाम्पत्य यांना भेटवस्तू म्हणून रोप दत्तक देऊन आगळी-वेगळी सामाजिक बांधीलकी जोपासत आहे.
साडेतीन वर्षांपूर्वी मलकापूर पंचायत समिती सदस्य असताना काळे आणि त्यांच्या मित्रमंडळीने परिसरात ६५०० रोपांची लागवड केली. रोप लागवडीनंतर पाणी देणे, ऊन, वारा आणि जनावरांपासून जपण्याची व संवर्धनाची जबाबदारी परिसरातील नागरिकांवर सोपविली; मात्र या रोपांकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने हजारो रोप अकाली जळाले. यातील केवळ ३००० रोप जगलीत. त्यानंतर काळे मित्र मंडळींनी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत बदल केला. लग्नात जाऊन नवदाम्पत्यांना रोप देण्याची अभिनव पद्धत सुरू केली. त्याचे कौतुकाने स्वागत झाल्याने ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत १४० जोडप्यांना रोप देण्यात आलीत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ होतात. लग्नसोहळ्यातील नवदाम्पत्यांना एक रोप दत्तक म्हणून दिले जाते. रोपाच्या संवर्धनाची जबाबदारीही त्यांच्यावर टाकली जाते. अनेकांनी रोपांची जपवणूक केल्याचे आशादायी चित्र दिसत आहे.
वृक्षतोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अकोला जिल्ह्याचे तापमान ४७ सेल्सिअस अंशाच्या पार जात आहे. सूर्य सातत्याने आग ओकत असल्याने अकोलेकरांना घराच्या बाहेर निघणे कठीण होत आहे. अकोल्याची ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. वृक्ष लागवडीच्या या सामाजिक कार्यात मंगेश काळे आणि त्यांची मित्र मंडळी थोडा का होईना, खारीचा वाटा उचलत आहेत.
-वृक्ष लागवडीच्या अनेक मोहीम मध्येच बंद पडतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे लागवडीनंतर त्या रोपाच्या संवर्धनाची जबाबदारी कु णी स्वीकारत नाही, हा माझा स्वानुभव आहे. जर रोप दत्तक दिले, तर त्या रोपाच्या लागवडीपासून तर संवर्धनापर्यंतची जबाबदारी व्यक्ती स्वीकारतात.
-मंगेळ काळे, शिवसेना नगरसेवक, मलकापूर-अकोला.
रोप दत्तक उपक्रमाचे शिलेदार
विवाह समारंभातील नवदाम्पत्यास रोप दत्तक देण्याच्या उपक्रमासाठी एक नर्सरी सुरू केली आहे. यामध्ये आंबा, आवळा आणि शोभिवंत फुलांच्या रोपांचा समावेश आहे. रोप दत्तक उपक्रमासाठी मंगेश काळेंसह प्रमोद धर्माळे, केदार खरे,जनार्दन राऊत, अजिंक्य वाघ, सागर भदे, अविनाश मोरे, अविनाश साबळे, प्रफुल्ल आडे, संदीप ढोले, राजू मिश्रा, अतुल राठोड, रोहित काळे, मुन्ना भागडे, सतीश डांगे, सतीश मदनकर, विलास शिंदे व जय पाटील परिश्रम घेत आहेत.