१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 10:53 AM2020-08-07T10:53:40+5:302020-08-07T10:54:00+5:30
१४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.
अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला २ हजार रुपयेप्रमाणे तीन समान हप्यात प्रतिवर्ष ६ हजार रुपये अनुदान देण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ४ आॅगस्टपर्यंत २ लाख ११ हजार ९८३ शेतकºयांची माहिती (डेटा) जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी १४ हजार १४० शेतकºयांच्या आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व इतर माहिती मधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्यापही जिल्ह्यातील तालुकास्तरावरील यंत्रणांमार्फत पूर्ण करण्यात आले नाही.
त्यामुळे संबंधित शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बँक खात्यात जमा होणाºया अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
त्रुटींची दुरुस्ती करा; जिल्हाधिकाºयांचे तहसीलदारांना निर्देश!
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकºयांच्या माहितीमधील त्रुटींची दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना ५ आॅगस्ट रोजी दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.