अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १.४२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान; सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग
By रवी दामोदर | Published: July 25, 2023 03:14 PM2023-07-25T15:14:49+5:302023-07-25T15:15:34+5:30
जिल्ह्यात या महिन्यात दि. १३, दि. १९, दि. २२ व दि. २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली आहेत
अकोला - जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत अद्यापपर्यंतच्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार १ लाख ४२ हजार ७५२ हेक्टर आर शेतीक्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पंचनामे व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहेत.
जिल्ह्यात या महिन्यात दि. १३, दि. १९, दि. २२ व दि. २३ जुलै रोजी अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ५२ महसूल मंडळांपैकी ३४ मंडळे अतिवृष्टीत बाधित झाली आहेत. आपत्तीमुळे तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ, तसेच स्थानिक बचाव पथकाने पुरामुळे अडकलेल्या ३० व्यक्तींना सुरक्षितस्थळी पोहोचविले आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त २४८ कुटुंबाना सानुग्रह मदत देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली. सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया प्रत्येक नुकसानाची अचूक नोंद घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून तालुकास्तरीय यंत्रणांना देण्यात आले आहेत.
१.३७ हेक्टरवरिल पिकांना फटका, २३ गुरे दगावली
जिल्ह्यात आतापर्यंतच्या झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आजरोजीपर्यंत झालेल्या सर्वेक्षणात प्राथमिक अंदाजानुसार, १ लाख ३७ हजार ६७८ हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, तसेच ५ हजार ७४ हे. आर. शेतजमीन खरडून गेली. अतिवृष्टीत पशुधनातील १५ दुधाळ व ८ लहानमोठी अशी २३ जनावरे दगावली. तसेच जिल्ह्यातील १० रस्ते व ५ पूल अशा १५ पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे.