अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १४२ पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:59 PM2020-12-21T17:59:16+5:302020-12-21T18:02:29+5:30
Sickle cell News१४२ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
अकोला : सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील १३ हजार ८१५ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४२ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांची आता ‘एचबी-इलेक्ट्रो फोरेसीस’ तपासणी केली जाणार असून, त्यानंतरच वाहक आणि बाधित रुग्णांची संख्या समोर येणार आहे. सिकलसेल जनजागृती सप्ताहांतर्गत शुक्रवार (दि.११) पासून जिल्ह्यात सिकलसेल जनजागृती आणि तपासणी मोहिमेस सुरुवात झाली. याअंतर्गत ३० वर्ष वयोगाटांतील युवक-युवतींनी लग्नापूर्वीच सिकलसेलची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम २०११-१२ पासून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली. सिकलसेल आजार कार्यक्रम हा जनतेमधील या आजाराचे प्रमाण शोधणे, जास्तीत जास्त लोकांची तपासणी करणे, सिकलसेल रुग्णांनी दुसऱ्या वाहक किंवा रुग्णाशी विवाह टाळावा, यासाठी विवाहपूर्व समुपदेशन करणे, सिकलसेल रुग्णांना रुग्णालय स्तरावर परिणाम व नियमित उपचार उपलब्ध करून देणे, रुग्णालय स्तरावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. गत वर्षी सप्ताहांतर्गत ५४ जणांना सिकलसेल असल्याचे आढळून आले होते. यंदा ही मोहीम जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयात राबविण्यात आली.
दहा वर्षांत ९,७३१ रुग्णांचा शोध
सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गत दहा वर्षांत जिल्ह्यातील ७ लाख, ३९ हजार १४१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ९ हजार ७३१ जणांची तपासणी पॉझिटिव्ह आढळून आले असून, यातील ४०२० हे सिकलसेल वाहक, तर २०० सिकलसेलचे रुग्ण आहेत.