१४२८ नापास विद्यार्थी देणार बारावीची सप्लिमेंटरी परीक्षा
By नितिन गव्हाळे | Published: May 26, 2024 09:32 PM2024-05-26T21:32:02+5:302024-05-26T21:32:18+5:30
परीक्षा १६ जुलैपासून: कला शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी
अकोला: राज्य मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह २७ मे ते ७ जून आणि विलंब शुल्कासह ८ ते १२ जून यादरम्यान भरता येणार असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील १ हजार ४२८ विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.
बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात कला शाखेच्या ७ हजार ८६६ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ८९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत; तर ९६९ विद्यार्थी नापास झाले आहेत. विज्ञान शाखेच्या १३ हजार ५७० पैकी १३ हजार २५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, केवळ ३२० विद्यार्थी नापास झाले आहेत, तर वाणिज्य शाखेच्या २ हजार ८५ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ १३९ विद्यार्थी नापास झाले आहेत.
बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि सर्व विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत जुलै, ऑगस्ट २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील. पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य मंडळाने परीक्षेसंदर्भातील परिपत्रक शुक्रवारी जाहीर केले आहे.
या तारखेपर्यंत करा अर्ज
राज्य मंडळाच्या परिपत्रकानुसार, विद्यार्थ्याचे अर्ज दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांनी ७ जूनपर्यंत चलनाद्वारे शुल्क बँकेत भरायचे आहे. तसेच १८ जूनला महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करायच्या आहेत. अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये आता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.