जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड
By admin | Published: May 1, 2017 03:16 AM2017-05-01T03:16:05+5:302017-05-01T03:16:05+5:30
विभागात १,०४१ गावे : विभागीय समन्वय समितीचा निर्णय
अकोला: जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आराखड्याला मान्यता देणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीने पाच जिल्ह्यातून १,०४१ गावांची निवड करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात १४४ गावांची निवड केली जाणार आहे.
शासनाने जलयुक्त शिवारच्या प्रभावी अंमलबजावणी आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित केली आहे. ही समिती आराखड्यास मान्यता देऊन कामांचा अहवाल शासनाला सादर करते. अमरावती विभागीय समितीची बैठक २४ एप्रिल रोजी पार पडली. या समितीने विभागातील पाचही जिल्ह्यातील गावांची संख्या निश्चित केली. २०१७-२०१८ मध्ये या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे केली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षात म्हणजे २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यातून निवड झालेल्या गावांचे उद्दिष्ट वजा करून नवे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. शिल्लक असलेल्या गावांपैकी केवळ २१ टक्केच गावांची निवड करण्यात आली.
सात दिवसात अंतिम यादी
विभागीय समितीने गाव निवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने सात दिवसांत गावांची अंतिम यादी निश्चित करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील गावांची निवड लवकरच होणार आहे.
७५ टक्के गावे अद्यापही शिल्लक
जलयुक्त शिवार अभियानात गेल्या दोन वर्षात सर्वच जिल्ह्यात निवड आणि कामे झालेल्या जिल्ह्याची संख्या केवळ २५ टक्के आहे. चालू वर्षात एकूण ७५ टक्के गावांमध्ये कामे होण्याची प्रतीक्षा आहे. त्यापैकी २१ टक्के गावांची निवड करण्यात आली आहे. अद्यापही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक गावे शिल्लक राहणार आहेत.
--