धनगर समाजातील लाभार्थींना १४७० घरकूल मंजूर
By संतोष येलकर | Published: February 24, 2024 05:37 PM2024-02-24T17:37:20+5:302024-02-24T17:39:32+5:30
जिल्ह्यात धनगर समाजातील लाभार्थ्यांना लवकरच घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे.
अकोला : भटक्या जमाती (भज क) प्रवर्गातील धनगर समाजासाठी घर बांधण्याची योजनांतर्गत जिल्ह्यात धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय समितीमार्फत दि. २० फेब्रुवारी रोजी १ हजार ४७० घरकूल मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘भज क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरबांधणीच्या योजनेत २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ देण्याकरिता जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांकडून लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार पंचायत समित्यांमार्फत धनगर समाज लाभार्थींचे प्रस्ताव समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यानुसार दि. २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांना १ हजार ४७० घरकूल मंजूर करण्यात आले. संबंधित घरकूल बांधकामांसाठी लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात धनगर समाजातील लाभार्थ्यांना लवकरच घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे.
तालुकानिहाय मंजूर
घरकुलांची संख्या !
तालुका घरकूल
अकोला ४५७
अकोट १२१
तेल्हारा १७८
पातूर १४३
बार्शिटाकळी ७९
बाळापूर २९२
मूर्तिजापूर २००
घरकूल बांधकामासाठी मिळणार १.२० लाख रुपये !
घरकूल मंजूर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील धनगर समाजातील लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी प्रत्येकी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात पहिल्यांदाच धनगर समाज लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ !
‘भज क’ प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरबांधणीच्या योजनेत जिल्ह्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्यांदाच घरकुल मंजूर करण्यात आले. त्यानुषंगाने जिल्ह्यात धनगर समाजातील लाभार्थ्यांना पहिल्यांदाचा घरकुलाचा लाभ मिळाला आहे.
शासनाच्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील धनगर समाजातील पात्र लाभार्थींसाठी घरकूल मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
अजित कुंभार, जिल्हाधिकारी
धनगर समाजासाठी घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात धनगर समाजातील लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषदांच्या सभांमध्ये वारंवार पाठपुरावा करण्यात आला. जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची निवड करून घरकूल मंजूर केले. त्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाजातील लाभार्थींना पहिल्यांदाच घरकुलाचा लाभ मिळणार आहे.
ज्ञानेश्वर सुलताने, सत्तापक्ष गटनेता, जिल्हा परिषद