पातुरातील ‘कोरोना’ संदिग्धांसाठी १४८ खाटांचा विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:42 AM2020-04-11T10:42:01+5:302020-04-11T10:42:17+5:30
पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत.
शिर्ला : पातुरातील सात ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या वस्तीतील संदिग्ध आढळून येणाऱ्यांसाठी १४८ खाटांचे वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालय उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राहुल खंडारे यांनी ‘लोकमत’ला दिली.
पातूर नगर परिषद आणि शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील मुजावरपुरा, मोमीनपुरा, काशीदपुरा, बादशहा नगर, गुलशन कॉलनी या शंभर टक्के ‘सील’ केलेल्या वस्तीतील नागरिकांची आरोग्य तपासणी चाळीस पथक, दहा डॉक्टर आणि दहा सुपरवायझर यांच्या माध्यमातून आजपासून सुरू झालेली आहे. तपासणीदरम्यान संसर्गाची लक्षणे आढळून येणाºया नागरिकांना पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. अधिष्ठाता गायत्री मावळे यांच्या मार्गदर्शनात आठ डॉक्टर, सहा नर्स यांच्यासह शासकीय वैद्यकीय विभागाचा आवश्यकतेनुसार उपलब्ध राहणार आहे.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले की, पातूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आल्याने सर्व खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. संदिग्धांची संख्या अधिक वाढल्यास पातूर येथील आयुर्वेद महाविद्यालय त्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यादरम्यान नागरिकांनी आपल्या घरातच राहावे.
नितीन देशमुख यांनी दिले १० लाख रुपये
आमदार नितीन देशमुख यांनी स्थानिक विकास निधी कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत कोविड-१९ च्या अनुषंगाने उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करण्याकरिता नगर परिषद पातूरकरिता दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी फेस मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझर, याव्यतिरिक्त कोरोना विषाणू संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सामग्री यंत्र आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वापरावा, अशी सूचना आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.