१४८ क्विंटल तुरीचा ट्रक दरीत ढकलून पेटविल्याचा बनाव उघड, पाेलिसांनी चार आराेपींना ठाेकल्या बेड्या

By आशीष गावंडे | Published: February 27, 2024 09:32 PM2024-02-27T21:32:11+5:302024-02-27T21:32:30+5:30

तुरीसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त

148 quintal turi truck was pushed into the valley and set on fire | १४८ क्विंटल तुरीचा ट्रक दरीत ढकलून पेटविल्याचा बनाव उघड, पाेलिसांनी चार आराेपींना ठाेकल्या बेड्या

१४८ क्विंटल तुरीचा ट्रक दरीत ढकलून पेटविल्याचा बनाव उघड, पाेलिसांनी चार आराेपींना ठाेकल्या बेड्या

अकाेला: शेतकऱ्याने इंदाैर येथे विक्रीसाठी पाठविलेला १४८ क्विंटल तुरीचा ट्रक सातपुड्याच्या दरीत ढकलून पेटविल्याचा बनाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी वेगाने तपासचक्र फिरवत पाेलिसांनी साेमवारी मध्यरात्री चार आराेपींना बेड्या ठाेकल्या आहेत.

याप्रकरणी पाेलिसांनी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे (३७)रा. मलकापुर भिल ता. अकोट, शिवम नागनाथ होळंबे (२७) रा. मलकापुर, ता. अकोट, अब्दुल इकबाल अब्दुल गफ्फार (५०)रा. गाजी प्लॉट अकोट, अन्सारोद्दीन हसिरोद्दीन (३०) रा. पणज ता. अकोट या चार जणांना अटक केली. चाेहाेट्टा बाजार येथील फिर्यादी राधेश्याम मधुकर पाटकर यांनी २२ फेब्रुवारी राेजी त्यांच्याकडील १४८ क्विंटल तूर मध्यप्रदेशातील इंदाैर येथे एका दाल मिलमध्ये विक्रीसाठी श्रीकृष्ण पंडितराव लटपटे यांच्या पांढ-या रंगाचे आयशर वाहनात पाठवली. परंतु २३ फेब्रुवारी राेजी इंदाैर येथे वाहन न पाेहचल्यामुळे श्रीकृष्ण लटपटे याने हा शेतमाल परस्पर कोठेतरी विक्री करून गाडी जळाल्याचा बनाव केल्याची तक्रार राधेश्याम पाटकर यांनी दहिहंडा पाेलिस ठाण्यात नाेंदवली असता, पाेलिसांनी २५ फेब्रुवारी राेजी भादंवि कलम ४०७, ४२० नुसार गुन्हा दाखल केला हाेता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक शंकर शेळके यांना गुन्हा उघडकिस आणन्याचे निर्देश दिले. याप्रकरणी ‘एलसीबी’चे ‘एपीआय’ राजेश जवरे, अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, भास्कर धोत्रे, सुलतान पठान, उमेश पराये, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हान, अक्षय बोबडे, वसिमोद्दीन, अन्सार अहेमद, स्वप्निल खेडकर,सायबर सेलचे अंमलदार आशिष आमले तसेच दहिहंडा ठाण्याचे ठाणेदार योगेश वाघमारे, अंमलदार प्रमोद लांडगे, सुदेश यादव, रामेश्वर भगत यांनी समांतर तपास करीत चार आराेपींना बेड्या ठाेकत शेतकऱ्याचा शेतमाल हस्तगत केला. 

ट्रक पेटवला; चिखलदऱ्यात खाेटी तक्रार
‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके व त्यांच्या पथकाने गाेपनिय पध्दतीने तपास केला असता, प्रकरणातील आराेपींनी ट्रक पोपटखेड हद्दीत दरीत ढकलून पेटवला. त्यापूर्वी ट्रकमधील तूर दुसऱ्या ट्रकमध्ये भरून विक्रीसाठी मराठवाडयाकडे रवाना केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, ट्रकला अपघात झाल्याची खाेटी तक्रार आराेपींनी चिखलदरा पाेलिसांत नाेंदवली हाेती. 

तुरीसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पाेलिसांनी मराठवाडयाकडे गेलेला ट्रक तब्यात घेत त्यातील तूर अंदाजे किंमत १३ रुपये व ट्रक असा एकुण ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पाेलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवल्यामुळे शेतकऱ्याला त्याचा शेतमाल परत मिळाला.

Web Title: 148 quintal turi truck was pushed into the valley and set on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.