दीड कोटींच्या बँक घोटाळयातील आरोपींची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 06:48 PM2019-12-30T18:48:49+5:302019-12-30T18:48:55+5:30
दिड कोटी रुपयांच्या घोटाळयातून सदर १७ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
अकोला - कौलखेड चौकातील सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या शाखेत दोन कोटींच्या ठेवीवर दीड कोटी रुपयांचे कर्ज बेकायदेशीररीत्या वाटप केल्याचा ठपका तत्कालीन बँक मॅनेजरसह १७ आरोपींवर ठेवण्यात आला होता. या दिड कोटी रुपयांच्या घोटाळयातून सदर १७ आरोपींची जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
अजगर मुल्ला फकरुद्दीन आणि शरीन अजगर यांच्या कौलखेड येथील सेंट्रल बँकमध्ये एकत्रीत असलेल्या एफसीएनआर डीपॉझीट रिसीप्ट दोन कोटींच्या ठेवीवर तत्कालीन बँक मॅनेजर मनोहर रामटेके यांनी दिड कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाला बेकायदेशीर तसेच बनावट दस्तोवेज असतांनाही मान्यता दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हे कर्ज प्रकरण मंजुर झाल्यानंतर नागपूर येथील आरोपी डॉ. रविंद्र जिकार याने ही रक्कम केजीका हर्बल नावाच्या खात्यामध्ये वळती केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही दीड कोटी रुपयांची रक्कम दिल्ली येथील रविसिंग सिंधु, पुण्यातील पंकज मंत्री, हैद्राबाद येथील नरसिंगदास बाहेती, नागपूर येथील महेश सावळकर, संजय वैराळे यांच्यासह १७ आरोपींच्या खात्यात वळती करण्यात आली होती. सदर कर्ज प्रकरण हे सेंट्रल बँक आॅफ इंडीयाच्या नियम व कायदे पायदळी तुडवून बनावट दस्तावेज सादर करुन, बनावट स्वाक्षºया तसेच फोटोही दुसºयाचे वापरुन तत्कालीन बँक मॅनेजर मनोहर रामटेके व त्यांच्या १६ साथीदारांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. बँकेचे तत्कालीन झोनल मॅनेजर शरद देशपांडे यांनी विभागीय चौकशी करून या प्रकरणाची तक्रार केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाकडे केली. सीबीआयचे तपास अधिकारी एस. के. नायर यांनी सखोल तपास करून १७ आरोपींच्या विरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.या प्रकरणात सीबीआयच्या वकीलांनी ५६ साक्षीदार तपासले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश डी पी शिंगाडे यांच्या न्यायालयाने १७ आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपी पंकज मंत्री, नरसिंगदास बाहेती व विष्णू बाहेती यांच्यावतीने अॅड प्रविण चिंचोले यांनी तर मनोहर रामटेके यांची बाजु अॅड. दिलदार खान यांनी मांडली. डॉ. रविंद्र जिकार यांची बाजु अॅड. दिनेश खुरानीया यांनी मांडली.