झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केले १५ फुटांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:16 AM2021-01-02T04:16:26+5:302021-01-02T04:16:26+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री येथील बसस्थानकाजवळ गत वीस ते पंचवीस वर्षांपासून झोपडपट्टी असून, या वस्तीतील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून ...
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री येथील बसस्थानकाजवळ गत वीस ते पंचवीस वर्षांपासून झोपडपट्टी असून, या वस्तीतील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. झोपडपट्टी भागात जाण्यासाठी गावातून एकमेव रस्ता आहे; परंतु या रस्त्यावर काही लोकांनी पंधरा फुटांपर्यंत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, त्यामुळे अडचणी येत असल्याचा आराेप त्रस्त झोपडपट्टीवासीयांनी केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांना २९ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. झोपडपट्टी भागात मजुरी करणारे व शेतकरी वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे रस्त्याने बैलगाडी व शेतमाल वाहून नेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे दरराेज वादविवाद होतात. त्यामुळे झोपडपट्टी भागातील सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिक्रमण आठ दिवसांच्या आत काढण्यात यावे, अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर जहूर खान लाल खा, फयाज बेग स्माईल बेग, शेख हुसेन, शेख यासीन, शेख नसीर, नुरखा, शेख आयाज, शेख लाल यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
......................
रस्त्याच्या परिसरातील दोन जणांच्या जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर या रस्त्याचे मोजमाप करून रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्यात येईल.
रेश्मा बी. अब्दुल शमीम, सरपंच, खेट्री