वीजमीटरचा तुटवडा संपुष्टात, राज्यात १५ लाख वीजमीटर उपलब्ध
By Atul.jaiswal | Published: August 26, 2021 10:38 AM2021-08-26T10:38:51+5:302021-08-26T10:38:58+5:30
15 lakh electricity meters available in the state : उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
अकोला : कोरोनाकाळातील वीजमीटरचा तुटवडा गेल्या पाच महिन्यांपासून संपुष्टात आला असून, महावितरणकडून गत पाच महिन्यांमध्ये सिंगल व थ्री फेजचे तब्बल १५ लाख ७६ हजार नवीन मीटर मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उच्च व लघुदाबाच्या ५ लाख १८ हजारांवर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
मागील वर्षी, मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरचा लॉकडाऊन तसेच इतर कारणांमुळे वीजमीटर उपलब्धता कमी होत गेली. त्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्याचा वेग काहीसा मंदावला होता. त्यानंतर मात्र वीजमीटर पुरवठ्याला गती आली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून सिंगल फेजचे १८ लाख तर थ्री फेजचे १ लाख ७० हजार नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचे कार्यादेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. मार्च २०२१ पासून पुरवठादारांकडून नवीन वीजमीटर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार, तर थ्री फेजचे १ लाख १० हजार नवीन मीटर मुख्यालयातून क्षेत्रीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत.
प्रादेशिक कार्यालयनिहाय मीटरपुरवठा
प्रादेशिक कार्यालय सिंगल फेज थ्री फेज
पुणे ४ लाख ६२ हजार ३९,१०३
कोकण ५ लाख ४५ हजार ३७,७८७
नागपूर २ लाख ९५ हजार २२,८६०
औरंगाबाद १ लाख ६४ हजार १०,२५०
वीजजोडण्यांना वेग
वीजमीटर उपलब्ध झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास मोठा वेग देण्यात आला आहे. वर्षभरात महावितरणकडून साधारणतः ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र, गेल्या मार्च ते जुलै २०२१ च्या कालावधीत उच्चदाबाच्या ४३५ आणि लघुदाबाच्या ५ लाख १८ हजार १४२ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे.