जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीसाठी १५ हजार शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:40 PM2019-04-12T14:40:17+5:302019-04-12T14:40:23+5:30
अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे.
- सदानंद सिरसाट
अकोला: राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये वर्ग-३ च्या एका पदाचा आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी एका उमेदवाराला तब्बल १५ हजार रुपये शुल्क भरण्याची वेळ शासनाने आणली आहे. ही बाब गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. बेरोजगार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना परीक्षेपासूनच दूर ठेवण्याच्या षड्यंत्राविरोधात अकोल्यातील उमेदवार एकवटले आहेत. गुरुवारी या मुद्यावर त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांना उद्या शुक्रवारी बोलाविण्यात आले.
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांमार्फत पदभरतीच्या जाहिराती ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे, मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केल्या. २६ मार्च ते १६ एप्रिल या काळात अर्ज स्वीकारण्याची आॅनलाइन प्रक्रिया सुरू केली. जिल्हा परिषदांच्या जाहिरातीमध्ये एका पदासाठी एकच अर्ज करण्याची अट आहे. एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास उमेदवारी रद्द करण्याचेही नमूद आहे. या माहितीने उमेदवारांचा गोंधळ उडाला. काही उमेदवारांनी याबाबत महापरीक्षा पोर्टलच्या संपर्क क्रमांकावर विचारणा केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उमेदवाराला एका पदासाठी कितीही अर्ज करता येतील. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेचे शुल्क स्वतंत्रपणे द्यावे लागेल. ही बाब ग्रामविकास विभागाच्या २४ आॅगस्ट २०१७ रोजीच्या निर्णयातही नमूद आहे. भरतीची जाहिरात आणि निर्णयातील तफावतीने उमेदवार भांबावलेले आहेत. उमेदवारांनी एका पदासाठी ठरावीक जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केल्यास कमीत कमी ७ हजार ते १७ हजार रुपये शुल्काचा भुर्दंड पडत आहे. ज्यांच्याकडे शुल्क भरण्याची ऐपत नाही, त्यांना एक किंवा दोनच जिल्हा परिषदेचा अर्ज भरून परीक्षा देण्याची वेळ शासनाने आणली आहे. ही बाब ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात मांडली. त्यामुळे बेरोजगार, आर्थिक कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना परीक्षेतून आधीच बाद करण्याचे षड्यंत्र असल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण झाली. त्यावर तोडगा निघेल, या आशेने उमेदवारांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. ती होऊ शकली नाही.
- रिक्त १३ पदांसाठी पात्र एका उमेदवाराला ४४२ परीक्षा
जिल्हा परिषदेच्या पदभरतीमध्ये रिक्त १३ पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने प्रत्येक पदासाठी ३४ जिल्हा परिषदांमध्ये स्वतंत्र अर्ज केल्यास त्याला ४४२ परीक्षा द्याव्या लागतील. त्याचे शुल्क २ लाख २१ हजार रुपये भरावे लागणार आहे. हा कमालीचा गोंधळ घालण्यात आला आहे.