खानापूर येथील १५ वर्षीय मुलीचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:46+5:302021-02-26T04:25:46+5:30
पातूर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवारी खानापूर येथील १५ वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ...
पातूर: शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, गुरुवारी खानापूर येथील १५ वर्षीय मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गत आठवड्यात तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३० वर पोहोचली असून, मृतांची संख्या दोन झाली आहे.
खानापूर येथील एका १५ वर्षीय मुलीने विष प्राशन केले होते. तिच्यावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, तिची कोरोना चाचणी केल्याने तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी दिली. गत आठवड्याभरात सक्रीय रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली असून, मृतांचा आकडा दोन झाल आहे. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
------------------------
व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने पातूर पोलीस स्टेशनमध्ये दुकानदार आणि व्यवसायिकांची बैठक घेतली. बैठकीमध्ये सर्व व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले. दि. २६ फेब्रुवारी रोजी शहरातील न.प. शाळा क्रमांक १ व २ आणी तालुक्यातील पांग्रा, चान्नी येते कोरोना तपासणी शिबिर आयोजित केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-------------------
विनामास्क फिरणाऱ्या १४ जणांवर कारवाई
शिर्ला ग्रामपंचायत आणि पातुर शहर हद्दीत दि.२५ फेब्रुवारी रोजी विना मास्क फिरणाऱ्या १४ जणांवर दंडात्मक कारवाई करून २,८०० रुपयांचा दंड वसूल केला.