उपजिल्हा रुग्णालयाची लोकांनी बळकावलेली १५० एकर जमीन महसूलच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:40 PM2021-06-24T16:40:07+5:302021-06-24T16:43:24+5:30
Murtijapur News : उपजिल्हा रुग्णालयाच्या १५० एकरवर केले होते अतिक्रमण.
- संजय उमक
मूर्तिजापूर : येथील लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालयाच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. संपूर्ण जमीनीवर महसूल प्रशासनाने ताबा मिळवला असून यातील सिरसो भाग १ व भाग २ मधिल (३७.६४ हेक्टर ) ९३ एकर जमीनीचा २४ जून गुरुवार रोजी एक वर्षाच्या वहितीसाठी लिलाव करुन १५ लाख रुपयांचा महसूल गोळा केला आहे. तर कुरणखेड, दताळा आणि सिरसो येथील उर्वरित जमीन लवकरच लिलावात निघणार आहे. यासाठी लोकमतने वारंवार पाठपुरावा करुन सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख यांनी सन १९३५मध्ये सदर रुग्णालय उभारले होते. हे रुग्णालय चालविणासाठी त्यांच्या मालकीची ५७ हेक्टर ८४ आर क्षेत्र शेत जमीन रुग्णालयाला दान देऊन येणाऱ्या मिळकतीतून काही वर्षे रुग्णालय चालविले. त्यानंतर १९५८ मध्ये हे रुग्णालय जमिनीसह शासनाला हस्तांतरित करून रुग्णालयाचे नाव श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा
रुग्णालय असे केले. तेव्हापासून हे रुग्णालय शासनच चालवित आहे. या रुग्णालयाकडे असलेली दीडशे एकर करून शेत जमीन दरवर्षी जाहिरात प्रसिद्ध करून वार्षिक पीक मक्त्याने देण्यासाठी
लिलाव करण्यात येत होता. परंतु, कक्ष अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी १२ फेब्रुवारी २०१४ ला संचालक, आरोग्य सेवा मुंबई यांना ही शेत जमीन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील असून, लक्ष्मीबाई देशमुख यांनी शासकीय रुग्णालयास रुगण सेवा देण्यास मदत होईल या हेतूने दानपत्र करून दिले असले तरीही जमीन शासकीय असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्यामुळे श्रीमती लक्षमीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयाची इमारत व निवासस्थाने ही २ हेक्टर ८७ आर जमीन वगळता उर्वरित ४५ हेक्टर २५ आर ही शेत जमीन जिल्हाधिकारी अकोला यांना हस्तांतरीत करण्यात आली आहे. २०१४ मध्ये हस्तांतरण झालेल्या जमीनीवर इतरत्र लोकांनी कब्जा करुन बळकावलेली आहे. ही जमीन त्या लोकांच्या कब्जातून काढून तिचा लिलाव करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांना दिला त्या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून लिलाव निश्चित करण्यात आला. गत ११ वर्षापासुन जमीनीचा लिलाव न झाल्याने आजपर्यंतचा मक्ता म्हणून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. या जमीनीचे विवरण, हस्तांतरण, वापर इत्यादी बाबत जमीनीचा शेती प्रयोजनासाठी शर्ती व अटी नुसार जिल्हा अधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या अंतर्गत सदर जमीन लिलावात काढल्याने निधी अभावी रुग्णालयात सुविधांची होत असलेली वाणवा भरुन काढण्यासाठी मदत होणार आहे. आता पर्यंत दताळा येथील ५.१० हेक्टर, सिरसो येथे ५७.८४ हेक्टर, व कुरणखेड येथील जमीनीसह तालुक्यातील दीडशे एकर जमीनीवर कब्जा केला होता.
आतापर्यंत जमीनीचा लिलाव न झाल्याने लोकांनी यावर ताबा मिळवला होता, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज रोजी सिरसो येथील ९३ हेक्टर जमीनीचा लिलाव करण्यात आला त्यामुळे १५ लाख महसूल गोळा होईल, सिरसो, दताळा, कुरणखेड येथील उर्वरित जमीनीचा लवकरच लिलाव करण्यात येईल.
-अभयसींह मोहिते,
उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर