१५१३ जणांनी केली चाचणी; १४९ जण काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:45+5:302021-04-07T04:19:45+5:30
काेराेना विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाला प्रारंभ हाेताच नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढीस लागली. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रूमाल न लावणे, ...
काेराेना विषाणूला आळा घालण्यासाठी लसीकरणाला प्रारंभ हाेताच नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढीस लागली. घराबाहेर निघताना ताेंडाला मास्क किंवा रूमाल न लावणे, आपसांत चर्चा करताना किमान चार फूट अंतर न राखणे याचे परिणाम समाेर आले आहेत. मागील काही दिवसांत शहरात काेराेनाचा झपाट्याने प्रसार झाला आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाची बाधा झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही बाब पाहता मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र उघडले आहेत. तरीही शहरात काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ हाेत चालल्याचे दिसून येत आहे. यामुळे वैद्यकीय सेवेवर ताण येत आहे. मंगळवारी १५१३ जणांनी चाचणी केंद्रांत जाऊन नमुने दिले. यामध्ये ३५८ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून ११५५ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली आहे. या सर्व संशयितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
झाेन अधिकाऱ्यांची दमछाक
शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काेराेनाचा संसर्ग पसरल्यामुळे मनपाने झाेननिहाय चाचणी केंद्रांसह फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेवणे, संशयित रुग्णांना हाेमक्वारंटाईनची परवानगी देणे, चाचणी केंद्रांमध्ये जमा केलेले नमुने तपासणीसाठी पाठविणे व त्यानंतर पुन्हा पाॅझिटिव्ह रुग्णांची उपचारासाठी मनधरणी करणे अशा अनेक कामांचा ताण मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर येत असून बाेटावर माेजता येणारे प्रामाणिक कर्मचारी वगळल्यास इतर कर्मचारी पळवाटा काढत आहेत.
१४९ जण पाॅझिटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडून मनपाला मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १४९ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेन अंतर्गत ७१, पश्चिम झोन १३, उत्तर झोन ३० आणि दक्षिण झोन अंतर्गत ३५ असे एकूण १४९ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.