अकोल्यात १६ कॉपीबहाद्दर निलंबित
By admin | Published: March 1, 2016 01:33 AM2016-03-01T01:33:09+5:302016-03-01T01:33:09+5:30
जिल्हाधिकार्यांचे स्टिंग ऑपरेशन: रूग्णवाहिकेमध्ये जाऊन पथकाची धाड.
बाश्रीटाकळी (अकोला) : बाश्रीटाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील जय बजरंग विद्यालयातील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर २९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पथकाने चक्क रुग्णवाहिकेतून जाऊन अचानक धाड टाकली. यावेळी केंद्रात कॉपी करणार्या १६ परीक्षार्थ्यांना पथकातील अधिकार्यांनी रंगेहात पकडून निलंबित केले.
रुस्तमाबाद येथील जय बजरंग विद्यालय परीक्षा केंद्रात १२ व्या वर्गाच्या रसायनशास्त्र विषयाचा पेपर सुरू होता. यावेळी जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष पथकाने या केंद्रावर अचानक धाड टाकली. या पथकाचे नेतृत्व अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी केले. या पथकात माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद व बाश्रीटाकळी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी समाधान जाधव यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे सामान्यत: कॉपी पकडण्यासाठी परीक्षा केंद्रावर धाड टाकणारे पथक सरकारी गाड्यांमधून जात असते. परंतु, या पथकातील अधिकारी चक्क एका रुग्णवाहिकेतून केंद्रावर पोहोचले. या पथकाने १६ परीक्षार्थींना कॉपी करताना पकडल्यानंतर जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनीदेखील परीक्षा केंद्राला भेट दिली. १६ परीक्षार्थींच्या निलंबनाचे प्रस्ताव अमरावती विभागीय परीक्षा मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत.