मूर्तिजापूर येथून १६ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:26+5:302021-09-02T04:40:26+5:30
दहशतवाद विरोधी कक्षाची मोठी कारवाई अकोला : मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती येथून एका ऑटोमध्ये विक्रीसाठी तब्बल १६ ...
दहशतवाद विरोधी कक्षाची मोठी कारवाई
अकोला : मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती येथून एका ऑटोमध्ये विक्रीसाठी तब्बल १६ किलो गांजा आणण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाला मिळाली. या माहितीवरून कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पथकासह छापा टाकून तब्बल १६ किलो गांजा व मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली.
अमरावती येथील रहिवासी शेख असिफ शेख युसूफ (२९) हा एम. एच.२७, बी.डब्ल्यू. ५१७१ क्रमांकाच्या ऑटोमध्ये अमरावती येथून मूर्तिजापूर येथे गांजा आणत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून पाटील यांनी पथकासह मूर्तिजापूरातील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. त्यानंतर या क्रमांकाची ऑटो येताच पोलिसांनी ती अडवून ताब्यात घेतली. त्यानंतर ऑटोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीचा १६ किलो गांजा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा गांजा जप्त केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीकडून गांजा व मुद्देमाल असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीला मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.