१६ लाख क्विंटल तुरीची खरेदी दोन दिवसात होणार सुरु!

By admin | Published: July 5, 2017 01:03 AM2017-07-05T01:03:28+5:302017-07-05T01:03:28+5:30

सोमवारपर्यंत चुकारे : मुख्यमंत्र्यांचे आ. बच्चू कडू यांना आश्वासन

16 lakh quintals of Purchase will start in two days! | १६ लाख क्विंटल तुरीची खरेदी दोन दिवसात होणार सुरु!

१६ लाख क्विंटल तुरीची खरेदी दोन दिवसात होणार सुरु!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागातील शेतकऱ्यांची १६ लाख १० हजार ५०० क्विंटल तूर खरेदी दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू यांना मंगळवारी दिले. तसेच विभागातील तूर खरेदीचे थकीत ७४ कोटी ८२ लाख रुपयांचे चुकारे सोमवारपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी (डीएमओ) दिले. त्यामुळे यासंदर्भात शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत हमी दराने ‘नाफेड’द्वारे दोन महिन्यांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या तुरीच्या रकमेचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. तसेच नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आल्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे अद्याप मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे या प्रश्नावर आक्रमक झालेल्या आ. बच्चू कडू यांच्यासह शेतकरी जागर मंच व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यातील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात जाऊन, जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ) बजरंग ढाकरे यांना घेराव घातला. घटनेची माहिती मिळताच शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तूर खरेदीचे चुकारे तातडीने शेतकऱ्यांना देण्यात यावे आणि टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरू करण्यात यावी, त्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका आ. बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच यासंदर्भात आ. बच्चू कडू व जिल्हा मार्केटिंग अधिकारी ढाकरे यांनी महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह फेडरेशचे व्यवस्थापकीय संचालक जे.पी. गुप्ता व सचिव विजय कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली.
त्यानंतर अकोला जिल्ह्यातील तूर खरेदीच्या थकीत चुकाऱ्यापोटी २० कोटी रुपयांसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील तूर खरेदीचे ७४ कोटी ८२ लाख रुपयांच्या चुकाऱ्याची रक्कम सोमवार, १० जुलैपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर रात्री ८ वाजता घेराव आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर तूर खरेदीच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी आ. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. नोंदणी करण्यात आलेल्या आणि टोकन देण्यात आलेल्या अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची १६ लाख १० हजार ५०० क्विंटल तूर खरेदी दोन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. बच्चू कडू यांना दिले.
त्यानुसार अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोजमाप बाकी असलेल्या १४ हजार ७१३ क्विंटल तुरीसह टोकन देण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील ३ लाख ५२ हजार २३७ क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया दोन दिवसात सुरू होणार आहे. अकोला जिल्ह्यासह अमरावती विभागात तूर खरेदी दोन दिवसात सुरू होणार असल्याने, यासंदर्भात शेतकरी जागर मंचच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले आहे. यावेळी शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, नीलेश ठोकळ, अतुल काळणे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, शिवाजी म्हैसने यांच्यासह प्रहार संघटना व शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 16 lakh quintals of Purchase will start in two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.