चोरीस गेलेला १६ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:20 AM2021-03-01T04:20:46+5:302021-03-01T04:20:46+5:30
पोलीस अधीक्षकांची संकल्पना, अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घडलेल्या चो-या तसेच विविध घटनांतील रोख रक्कम आणि वाहनांसह ...
पोलीस अधीक्षकांची संकल्पना,
अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील घडलेल्या चो-या तसेच विविध घटनांतील रोख रक्कम आणि वाहनांसह इतर मुद्देमाल परत करण्यासाठी विशेष उपक्रम राबवून हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील फिर्यादींना तब्बल १६ लाख २० हजार ५२१ रुपयांचा मुद्देमाल शनिवारी परत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या पथकांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन जप्त केला आहे. त्यानंतर, आवश्यक ती प्रक्रिया झाल्यानंतर हा मुद्देमाल परत करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल संबंधित फिर्यांदीना परत केला. प्रत्येक पोलीस स्टेशनच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करून हा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. यामध्ये तीन लाख ९७ हजार ८०० रुपये किमतीची आठ चोरीस गेलेली वाहने त्यांच्या मालकांना परत करण्यात आली आहेत. यासोबतच तीन लाख ५८ हजार ४८८ रुपयांचे ३१ मोबाइल परत करण्यात आले आहेत. सात लाख ३२ हजार ६३३ रुपयांचे सोने व चांदीचे दागिने फिर्यादींना परत करण्यात आले आहे. यासोबतच, एक लाख १३ हजार ६०० रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकून १६ लाख २० हजार ५२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो परत करण्यात आला आहे.
----------------------