बाळापूर तालुक्यातील १६ जिल्हा परिषद शाळा होणार डिजिटल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:23 AM2021-02-25T04:23:03+5:302021-02-25T04:23:03+5:30
बाळापूर : सध्या डिजिटल ही संकल्पना सर्वच क्षेत्रांमध्ये राबविण्यात येत असून, अनेक शिक्षकांनीही आपली शाळा डिजिटल होण्यासाठी कंबर कसली ...
बाळापूर : सध्या डिजिटल ही संकल्पना सर्वच क्षेत्रांमध्ये राबविण्यात येत असून, अनेक शिक्षकांनीही आपली शाळा डिजिटल होण्यासाठी कंबर कसली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी व शाळा डिजिटल करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन माहिती मागवली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती सादर केली असून, भविष्यात तालुक्यातील १६ शाळा डिजिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा या खासगी शाळांच्या तुलनेत कमी पडू नयेत तसेच गोरगरीब मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतून दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद) यांना पत्र देऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची यादी सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेचे नाव व पटसंख्या याविषयीची माहिती सादर केली आहे.
पंचायत समिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना सादर केलेल्या शाळांच्या यादीतील पहिल्या टप्प्यात बाळापूर तालुक्यातील १६ शाळा पात्र ठरल्या असून, त्यांची ३ मार्चपासून डिजिटल होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु होणार आहे.
ह्या शाळा होणार डिजिटल!
बाळापूर तालुक्यातील हाता, मोखा, गायगाव, कळंबी महागाव, कळंबा बु, कसुरा, मनारखेड, टाकळी निमकर्दा, जोगलखेड, मोरझाडी, काजीखेड, लोहारा, कान्हेरी (गवळी), नागद, अंत्री (मलकापूर,) मोरगाव (सादीजन ) या शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक २ मार्च २०२१पूर्वी डिजिटल करण्याचा आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिला आहे.