अकोला परिमंडळातील १६ हजार कृषिपंप ग्राहक थकबाकी मुक्तीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:30+5:302021-04-08T04:19:30+5:30
परिमंडलातील २ लाख ९३ हजार ४२८ कृषिपंप ग्राहकांना महावितरण कृषी वीज जोडणी धोरण - २०२० नुसार वीजबिल कोरे करण्याची ...
परिमंडलातील २ लाख ९३ हजार ४२८ कृषिपंप ग्राहकांना महावितरण कृषी वीज जोडणी धोरण - २०२० नुसार वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत २ हजार ७७२ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण १ हजार ४५ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या १७२७ कोटी १९ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे सुमारे ८६३ कोटी ५९ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकित वीजबिलही कोरे होणार असल्याने, वीजबिल थकबाकीमुक्तीच्या या अभियानात सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.
कृषिपंपाच्या नवीन वीज जोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून जाहीर झाले आहे. या धोरणानुसार अकोला परिमंडळातील १५ हजार ९७८ कृषिपंप ग्राहकांनी ११ कोटी ३६ लाख रूपयांचा भरणा करत थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये अकोला जिल्हयातील २९८१ कृषिपंप ग्राहकांनी २ कोटी ९५ लाख ,बुलढाणा जिल्हयातील ५३४५ कृषिपंप ग्राहकांनी ४ कोटी ९९ लक्ष रूपयांचा तर वाशीम जिल्ह्यातील ७६५२ ग्राहकांनी ३ कोटी ४२ लक्ष रूपये थकबाकीचा भरणा केला आहे.
ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.