अकोट येथे बाजार समितीत १६.१९ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:15 AM2021-06-20T04:15:00+5:302021-06-20T04:15:00+5:30
अकोट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदाचा गैरवापर करून संगनमताने कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून १६ लाख ...
अकोट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पदाचा गैरवापर करून संगनमताने कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून १६ लाख १९ हजार ७८५ रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली सचिव राजकुमार माळवे व लेखापाल मंगेश बोंद्रे यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीत सन २०१३ पासून राजकुमार माळवे हे सचिवपदावर व मंगेश नवीनचंद्र बोंद्रे लेखापाल या पदावर कार्यरत आहे. बाजार समितीचे १ एप्रिल २०१३ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये प्रत्येक वित्तीय वर्षाचे लेखापरीक्षण अहवालानुसार, सचिव राजकुमार माळवे व लेखापाल मंगेश बोंद्रे यांनी संगनमत करून लेखापरीक्षण अहवालात नमूद केल्याप्रमाणे विभाग आर्थिक बाबतीत केलेले गंभीर आक्षेप व वित्तीय वर्षात केलेल्या खर्चामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटची फसवणूक करून अपहार केलेला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०१९ ते २०२० या वर्षाचे लेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षक देशपांडे यांनी केले. या लेखापरीक्षण अहवालातील आर्थिक बाबतीत केलेल्या गंभीर आक्षेपांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन २०१९-२० मध्ये सचिव राजकुमार माळवे व लेखापाल मंगेश बोंद्रे यांनी संगनमताने पदाचा गैरवापर करून कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून १६ लाख १९ हजार ७८५ रुपयांचा अपहार केला, अशी पुराव्यानिशी लेखी तक्रार अतुल माधवराव म्हैसने, राजकुमार माणिकराव मंगळे व विलास नाशिकराव साबळे या बाजार समितीच्या तीन माजी संचालक यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. या तक्रारीसंदर्भात शहर पोलिसांनी संबंधितांची चौकशी सुरू केली होती. बाजार समिती सचिव यांना तक्रारी अनुषंगाने प्रमुख आक्षेपार्ह सात मुद्द्यांवर माहितीसह कागदपत्रांचीसुद्धा मागितली होती. या प्रकरणी लेखी तक्रारीवरून आरोपी राजकुमार यशवंतराव माळवे (रा. कृषी विद्यापीठ परिसर, अकोला) व मंगेश नवीनचंद्र बोंद्रे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. या प्रकरणी तपासात गुन्ह्याच्या कलमांत व आरोपी वाढण्याची शक्यता असून, शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.