१६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: July 5, 2017 01:37 AM2017-07-05T01:37:17+5:302017-07-05T01:37:17+5:30
ग्रामीणमधील ९१ तर शहरातील ७१ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मंगळवारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीची दुसरी यादी जाहीर केली. यादीमध्ये १६२ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. यामध्ये एएसआय, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.
रमजान ईद उत्सवातील बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तीन महिन्यांपूर्वीच पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील व शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती आणि यादीनुसार बदलीसाठी पसंतीच्या तीन पोलीस ठाण्यांचीसुद्धा नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार ४०० च्या जवळपास पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्ज केले होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस वृंद परिषदेचे आयोजन करून पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या आणि पाहिजे तिथे बदली या संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या आवश्यकतेनुसार रिक्त जागांचा विचार करून पोलीस कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या तीन ठिकाणांपैकी एका ठिकाणी १६२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी दिलेल्या पसंतीच्या ठिकाणीच त्यांची बदली झाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होईल. पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यासोबतच कुटुंबास अधिक वेळ देता येईल, या दृष्टिकोनातूनच त्यांच्या विनंतीचा विचार करूनच बदली करण्यात आली. बदली केलेल्या कर्मचाऱ्यांच्या यादीमध्ये शहरातील ७१ पोलीस कर्मचारी आणि ग्रामीण पोलीस ठाण्यांमधील ९१ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.