मिनरल वॉटरसाठी दररोज होतो १६.५ लाख लीटर पाण्याचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:00 PM2019-05-14T12:00:05+5:302019-05-14T12:00:50+5:30
अकोला : अकोला शहरात मिनरल वॉटर कॅन विक्रीसाठी दररोज साडेसोळा लाख लीटर पाण्याचा जमिनीतून उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
- संजय खांडेकर
अकोला : अकोला शहरात मिनरल वॉटर कॅन विक्रीसाठी दररोज साडेसोळा लाख लीटर पाण्याचा जमिनीतून उपसा होत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
लग्नसमारंभ असो की कोणताही कार्यक्रम त्यात मिनरल वॉटर कॅनचा उपयोग सर्रास होताना दिसतो. शुद्ध पाण्याच्या जनजागृतीमुळे शहरासह आता गावातही काही प्रमाणात मिनरल वॉटर कॅनचा वापर सुरू झाला असून, मिनरल वॉटरची कॅन विकत घेणे शहरवासीयांच्या अंगवळणी पडले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय असो किंवा गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्थळ असो, प्रत्येक ठिकाणी मिनरल वॉटर कॅन हमखास दिसते. शुद्ध पाण्याची जनजागृती आणि नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अनेकांनी मिनरल वॉटर प्लांटचा उद्योग सुरू केला आहे. ज्यांच्या बोअर्सला भरपूर पाणी लागले, त्यांनी दोन ते साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक करून हा उद्योग सुरू केला आहे. शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू असतानादेखील ११० मिनरल वॉटर प्लांटच्या संचालकांना कोणताही परिणाम झालेला नाही. हे सर्व उद्योजक दररोज सरासरी ३०० वॉटर कॅनची ३० रुपये प्रतिकॅ न विक्री करतात. त्यामुळे दररोज हे उद्योजक एक लाख रुपयांची कमाई करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रत्येक प्लॉन्टवर ६० टक्के पाण्याची नासाडी
अकोल्यात असलेले ११० प्लॉन्टधारकांना दररोज, प्रत्येकी तीनशे मिनरल वॉटरच्या कॅन विकाव्या लागतात. त्यासाठी दररोज भूगर्भातून साडेसोळा लाख लीटर पाण्याचा उपसा केला जातो. साडेसोळा लाख लीटर पाण्याचा उपसा केल्यानंतर त्यातून केवळ साडेसहा लाख लीटर पाणी शुध्द निघते. यातील ६० टक्के क्षारयुक्त असल्याने त्याची नासाडी होते. साडेसहा लाख लीटर पाण्याच्या शुद्धीसाठी, दररोज १० लाख लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर येत आहे.
वर्षभरात वाढले ३० वॉटर प्लॉन्ट
मागील वर्षी अकोल्यात ८० मिनरल वॉटर प्लांट होते. त्यात यंदा ३० प्लांटची भर पडली आहे. त्यामुळे आता अकोल्यात ११० मिनरल वॉटर प्लांट कार्यरत आहेत. कौलखेड, मलकापूर, खेतान नगर, सोमठाणा, उमरी, खोलेश्वर, रणपिसे नगर, कुंभारी, डोंगरगाव, बाभूळगाव, निमकर्दा, एमआयडीसी परिसरात हे उद्योग आता सुरू झाले आहेत.
३३ हजार मिनरल वॉटर कॅनची दररोज अकोल्यात विक्री
लग्न समारंभ, विविध कार्यक्रम, शासकीय-निमशासकीय कार्यालयांकडून येणारी कॅनची मागणी लक्षात घेता ११० प्लॉन्टधारकांकडून अकोल्यात दररोज ३३ हजार मिनरल वॉटर कॅनची विक्री होते. एक प्लॉन्टधारक सरासरी किमान तीनशे कॅनची विक्री करतो. मागणीनुसार पुरवठा करणाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याचेही समोर येत आहे.
टीडीएसचा घोळ कायम
पिण्याच्या पाण्यात तीनशेपर्यंत टीडीएस असले पाहिजे; मात्र पाण्याची चव चांगली येण्यासाठी पाण्यातील टीडीएस कमी करण्याचे प्रयोग अकोल्यासह सर्वत्र सुरू झाले आहे. आरोग्यासाठी ही बाब अत्यंत घातक आहे. पॅकिंग बॉटल्समधील ड्रिंकिंग वॉटरमध्ये सर्वात कमी टीडीएस राहत असल्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे.