अकोला जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी १६७ विकास केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:51 PM2018-07-20T12:51:52+5:302018-07-20T12:55:27+5:30
अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या २७१ एवढी पुढे आली असून, त्यांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात १६७ ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे
अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या २७१ एवढी पुढे आली असून, त्यांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात १६७ ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना देण्यात आले.
पावसाळ््यात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढते. काही प्रमाणात बालमृत्यूही वाढतात. ही बाब आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासाठी आव्हानात्मक ठरते. त्यातच जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची चर्चा दरम्यानच्या काळात झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाने ही बाब गांभीर्याने घेत उपाययोजनांची सुरुवात केली. राजमाता जिजाऊ मिशन अंतर्गत आरोग्य विभागाने आशा, अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण दिले. त्यानुसार जिल्ह्यात कुपोषित बालकांचा नव्याने शोध घेण्यात आला. गृहभेटीतून प्रत्येक बालकाचे वजन, उंची, दंडघेर, आरोग्यविषयक तक्रारींची माहिती घेण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील आठही प्रकल्पांत २७१ बालके कुपोषित असल्याचे पुढे आले. त्यापैकी तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांवर उपचार करण्याची सोय ग्राम बालविकास केंद्रात करण्यात आली. या केंद्रातील सकस आहार व औषधीचा खर्च भागवण्यासाठी अंगणवाडी स्तरावरच व्हीसीडीसीचा निधी देण्यात आला. तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या संख्येनुसार जिल्ह्यात ग्राम बालविकास केंद्रांची संख्या निश्चित झाली. २७१ बालकांवर १६७ केंद्रात उपचार सुरू झाले आहेत.