१७९ शिक्षकांवर कारवाईचे आदेशच नाहीत!
By admin | Published: February 17, 2017 02:44 AM2017-02-17T02:44:31+5:302017-02-17T02:44:31+5:30
अकोला जि.प. अंतर्गत शिक्षकांचेआंतरजिल्हा बदली प्रकरण; विभागीय आयुक्तांच्या अहवालाकडे दुर्लक्ष.
अकोला, दि. १६-जिल्हा परिषदेत पाच वर्षांच्या कार्यकाळात शेकडो आंतरजिल्हा बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांनी मे २0१६ मध्येच शासनाकडे सादर केला. अनियमिततेला जबाबदार मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह सर्व संबंधितांवर कारवाई करा, एवढेच शासनाने त्यावर सांगितले. त्याचवेळी १७९ शिक्षकांवर करावयाच्या कारवाईचे कोणतेच निर्देश न दिल्याने शिक्षण विभाग हातावर हात ठेवून बसला आहे. त्यामुळे नियमांना पायदळी तुडविणार्यांना शासनच पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे.
इतर जिल्हा परिषदांमधून अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने शेकडो शिक्षकांना सामावून घेण्यात आले. ते करताना शासन नियमांची पुरती पायमल्ली करण्यात आली. २0११ ते २0१५ या काळात आंतरजिल्हा बदल्यांमधून मुख्य कार्यकारी अधिकार्यांपासून सर्व संबंधितांनी शिक्षकांकडून चांगलाच मलिदा लाटत सामावून घेतले. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांमुळे अकोला जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली मोडकळीस आली. त्यामुळे पदोन्नतीसाठी पात्र शेकडो शिक्षकांवर अन्याय झाला. शासनाकडे या बाबींच्या तक्रारी झाल्या. त्याची चौकशी विभागीय आयुक्तांच्या पथकाने केली. त्या पथकाचा चौकशी अहवाल शालेय शिक्षण विभागाकडे मे २0१६ मध्येच सादर करण्यात आला. त्या अहवालावरून आंतरजिल्हा बदल्यांचा घोळ करणार्या जबाबदार अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाईची प्रक्रिया शासनाच्या स्तरावर सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे, तर त्याचवेळी ज्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेतल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या पदोन्नतीचा गळा घोटण्यात आला, त्या शिक्षकांवर कारवाईचे कोणतेही ठोस आदेश शासनाने दिलेच नाहीत. त्यामध्ये ८५ शिक्षकांच्या बदल्या एकतर्फी आदेशाने, ७९ शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या, तर १५ शिक्षकांच्याही बदल्यांचा घोळ आहेच. एकूण १७९ शिक्षकांच्या बदल्यांमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी चांगलाच मलिदा लाटत अनियमितता केल्याचे उघड झाले आहे. त्यामध्ये २0११ ते २0१५ या काळातील मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा समावेश आहे.
चौकशी अहवालामध्ये आंतरजिल्हा बदल्यांतील अनियमिततेला जबाबदार अधिकार्यांवर शासनाने कारवाई सुरू केल्याची माहिती आहे.
सर्व शिक्षकांवर कारवाईनंतरच बिंदू नामावली
जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली दुरुस्त करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीने आलेले १७९ आणि जिल्हा परिषदेने राखीव जागांवर नियुक्ती दिलेल्या १३२ शिक्षकांनी जातवैधताच सादर केली नाही, त्या शिक्षकांना बडतर्फ करण्याची तरतूद आहे; मात्र आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांवर करावयाच्या कारवाईबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. त्यासाठी शासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले.