जिल्ह्यातील २६१ युवकांना व्यवसायासाठी १७ कोटींचे कर्जवाटप
By Atul.jaiswal | Published: September 19, 2023 02:48 PM2023-09-19T14:48:18+5:302023-09-19T14:49:34+5:30
योजनेतून नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी
अतुल जयस्वाल, अकोला: अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक युवकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातर्फे आतापर्यंत जिल्ह्यातील २६१ लाभार्थ्यांना एकूण१६ कोटी ९६ लाख ८३ हजार ९१३ रुपये कर्जवाटप करण्यात आले असून, त्यांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी मदत झाली आहे.
महामंडळातर्फे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाच्या माध्यमातून मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात युवक-युवतींना व्यवसायासाठी सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत महामंडळाचे कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजाचा परतावा महामंडळाकडून केला जातो. त्यामुळे व्यवसाय उभारणीसाठी दिलासा मिळतो. मराठा समाजातील युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून मदत मिळते.
आतापर्यंत या योजनेत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून विविध युवकांनी घेतलेल्या कर्जावर १ कोटी ६३ लाख ८२ हजार ६९० रकमेचा व्याज परतावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, चालू वर्षात अकोला जिल्ह्यात ३७ लाभार्थ्यांना ३ कोटी १८ लक्ष २० हजार ८२९ रुपये इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रोहित पाटील यांनी दिली.
अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनेतून मराठा समाजातील नागरिकांना उद्योग व व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या कर्जाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मेडिकल, कृषी सेवा केंद्र, हॉटेल, मालवाहतूक वाहने, ट्रॅक्टर, किराणा दुकान, फुटवेअर, टेलरिंग दुकान असे विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळते.