शौचालयांच्या माध्यमातून १७ लाख लाटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 02:15 AM2016-10-14T02:15:11+5:302016-10-14T02:17:55+5:30
अकोला मनपा आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.
अकोला, दि. १३- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उघड्यावर शौच करणार्या नागरिकांना वैयक्तिक शौचालय उभारून देण्याच्या नावाखाली महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाने तब्बल २८७ बोगस लाभार्थींंची यादी केली. संबंधित लाभार्थींंच्या खात्यात एकूण १७ लाख २२ हजार रुपये जमा होण्यापूर्वीच हा प्रयत्न उधळला गेला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मनपा क्षेत्रात वैयक्तिक शौचालय उभारण्याचे महापालिकेला निर्देश आहेत. मनपाच्या स्तरावर आयुक्त अजय लहाने यांनी पात्र लाभार्थींंचा शोध घेण्यासाठी आरोग्य निरीक्षकांवर जबाबदारी सोपवली. आरोग्य निरीक्षकांच्या शोध मोहिमेत १0 हजार ७00 लाभार्थी आढळून आले. शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून १४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून पात्र लाभार्थींंच्या खात्यात केंद्राचे सहा हजार रुपये व उर्वरित सहा हजार रुपये राज्य शासनाने जमा करण्याची अट आहे. मनपानेदेखील यामध्ये ३ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये लाभार्थींंच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, प्रभाग क्रमांक २९ मध्ये आरोग्य निरीक्षक जय निंधाने यांची शौचालयाच्या कामातील वादग्रस्त भूमिका समोर येताच त्यांना आयुक्त अजय लहाने यांनी निलंबित केले. त्यांच्या जागेवर आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड यांची नियुक्ती करण्यात आली. पुंड यांनी पात्र लाभार्थींंच्या यादीची तपासणी केली असता निलंबित आरोग्य निरीक्षक जय निंधाने याने चक्क २८७ बोगस लाभार्थींंंची यादी तयार करून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ६ हजार रुपये जमा करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला.
उपायुक्तांकडे सोपवली चौकशी
मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता चौकशीसाठी उपायुक्त समाधान सोळंके यांची नियुक्ती केली होती उपायुक्तांच्या चौकशी अहवालात आरोग्य निरीक्षकावर ठपका ठेवण्यात आला आहे.
न्यायालयातून स्थगिती
मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांनी चौकशी अहवाल पूर्ण केल्यानंतर प्रशासनाने आरोग्य निरीक्षक निंधाने यांना नोटीस जारी केली. त्यावर निंधाने यांनी कामगार न्यायालयात धाव घेऊन मनपाच्या संभाव्य कारवाईवर स्थगिती मिळवल्याची माहिती आहे.
चौकशी पथकांच्या तपासणीचे काय?
मनपाने उभारलेल्या वैयक्तिक शौचालयांच्या तपासणीसाठी आयुक्तांनी झोननिहाय पथकांचे गठन केले होते. यामध्ये पूर्व झोन-सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पश्चिम झोन-शहर अभियंता इक्बाल खान, उत्तर झोन-जलप्रदायचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे तसेच दक्षिण झोन-सहायक आयुक्त जीतकुमार शेजव यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. तपासणीदरम्यान या पथकांना नेमके काय आढळले, याची माहिती उपलब्ध होण्याची गरज आहे.