कुरूम परिसरातील १७ कामगारांची तेलंगणातून केली सुटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:06 AM2017-12-27T02:06:44+5:302017-12-27T02:09:03+5:30
मूर्तिजापूर: एका अनोळखी व्यक्तीने कुरूम परिसरातील १७ कामगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांचे वेठबिगाराप्रमाणे शोषण करण्यात येत असल्याच्या माहितीवरून माना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तेलंगणातून त्या १७ कामगारांची सुटका करून २५ डिसेंबरला त्यांच्या घरी पोहोचवून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: एका अनोळखी व्यक्तीने कुरूम परिसरातील १७ कामगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून तेलंगणातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांचे वेठबिगाराप्रमाणे शोषण करण्यात येत असल्याच्या माहितीवरून माना पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तेलंगणातून त्या १७ कामगारांची सुटका करून २५ डिसेंबरला त्यांच्या घरी पोहोचवून दिले.
मनोहर चव्हाण असे नाव सांगणार्या एका अनोळखी व्यक्तीने १८ डिसेंबर रोजी कुरूम परिसरातील गावांमधील १७ कामगारांना रोजगार देतो, असे खोटे आमिष देऊन तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्याच्या जहिराबाद तालुक्यातील उदनूर गावात नेले. तेथे त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात आले. तेथील एल.आर. रेड्डी यांच्या शेतात त्यांना कठीण कामे करावयास लावले. त्यांना एकच वेळचे जेवण देण्यात येत होते. कामानंतर कोठडीसारख्या घरात कैद्यांसारखे ठेवण्यात येत होते. त्यापैकी एका कामगाराने कुरूम गावातील सुभाष काळे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. काळे यांनी मानाचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांना सांगितला.
ठाणेदार घुगे यांनी या प्रकाराची स्टेशन डायरीत नोंद केली. त्यानंतर घुगे यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना याबाबत सांगितले. कलासागर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एक पथक तयार करून उदनूरला पाठविले. त्या विभागातील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भाऊराव घुगे, पो.हे.कॉ. बाळकृष्ण नलवाडे, नंदकिशोर सुळे, अजय माहुरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली.
कैद्यासारखे ठेवले होते बंदिस्त
उदनूरमध्ये एका घरात कैद्यांसारखे बंद ठेवलेल्या आशीष टाले, पंकज सोळंके, प्रफुल्ल कपिले, भूषण काळे, प्रदीप तिडके, पिंटू शिरभाते, शेखर ऊर्फ पिंटू इंगोले, नीलेश इंगोले, मोहन सरदार, अजय इंगोले, सुधाकर इंगोले, जीवन इंगोले, विजय इंगोले, अतुल सोळंके, अन्नपूर्णा जोगदंड, डिगांबर जोगदंड व संतोष वानखडे या १७ कामगारांची माना पोलिसांनी सुटका करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले.