मास्क, सॅनिटायझर खरेदीवर १.७० कोटी रुपयांचा खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:16 AM2020-07-10T10:16:40+5:302020-07-10T10:16:50+5:30
मास्क व सॅनियटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनांकरिता जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) प्राप्त ३ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजनांवर ८ जुलैपर्यंत २ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यामध्ये प्रामुख्याने मास्क व सॅनियटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढता रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ३ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, १७८ आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशा स्वयंसेविकांना मास्क, सॅनियटाझर तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना गावांमध्ये फवारणीसाठी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन, प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप आदी उपाययोजनांवर जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८ जुलैपर्यंत २ कोटी २३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने मास्क व सॅनिटायझर खरेदीवर १ कोटी ७० लाख ४८ हजार १५१ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ई-गव्हर्मेंट मार्केटिंग पोर्टलद्वारे मास्क व सॅनिटायझरची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
१४ रुपये ८२ पैसे दराने ६.२७ लाख ‘मास्क’ची खरेदी!
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १४ रुपये ८२ पैसे दराने ९२ लाख ९२ हजार १४० रुपयांच्या निधीतून ६ लाख २७ हजार ‘ट्रीपल लेअर मास्क’ची खरेदी करण्यात आली. त्यापैकी ६ लाख मास्क जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी आणि जिल्हा परिषद विभागप्रमुखांना वितरित करण्यात आले असून, २७ हजार मास्क आरोग्य विभागाकडे सद्यस्थितीत जमा आहेत.
सॅनिटायझर खरेदीवर ७७.५६ लाख खर्च!
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ७७ लाख ५६ हजार ११ रुपयांच्या निधीतून सॅनिटाझर खरेदी करण्यात आले. त्यामध्ये १०० मिलिलीटर प्रती बॉटल ४३ रुपये दराने ३६ हजार ३९० बॉटल सॅनिटाझर खरेदीवर १५ लाख ८२ हजार ९६५ रुपये आणि ५०० मिलिलीटर प्रती बॉटल २२४ रुपये ७० पैसे दराने २७ हजार १८० बॉटल सॅनिटायझर खरेदीवर ६१ लाख ७३ हजार ४६ रुपये खर्च करण्यात आला आहे.