अकोला जिल्ह्यातील १.७५ लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:18 PM2019-05-17T14:18:34+5:302019-05-17T14:18:40+5:30
पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
अकोला: २६ जून रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके देण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९ लाख २२ हजार ६२९ पाठ्यपुस्तकांचे पहिल्या दिवशी वितरण करण्यात येणार आहे. १00 टक्के पुस्तके वितरण करण्याचे शिक्षण विभागाने टार्गेट ठेवले असून, त्यादृष्टीने समग्र शिक्षाच्यावतीने बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी केली आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद आणि शासकीय, अनुदानित, शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाºया विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदवावी लागते. यंदा प्राथमिक शिक्षण विभागाने बालभारतीकडे ९ लाख २२ हजार पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. त्यानुसार बालभारतीकडून प्राथमिक शिक्षण विभागाला लवकरच पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे. पुस्तकांचा साठा प्राप्त झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. २२ जूनपर्यंत १00 टक्के शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्याचे नियोजन समग्र शिक्षा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पंचायत समितीनिहाय स्थिती
तालुका विद्यार्थी पाठ्यपुस्तके
अकोला ५३१९७ २,८१,७४९
बार्शीटाकळी १७३८३ ८९0४९
अकोट १७३८३ १४८३२५
तेल्हारा २0८५९ १,0७,८६६
बाळापूर २१६३४ ११७६६१
पातूर १६,८३९ ७९,९३३
मूर्तिजापूर १५९५७ ८४१७0