डेंग्यूसदृश्य तापाने पाच वर्षात घेतले १७५ बळी
By admin | Published: October 12, 2014 12:41 AM2014-10-12T00:41:19+5:302014-10-12T00:41:49+5:30
गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण.
बुलडाणा : गाव परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य, स्वच्छतेकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष आणि वातावरणातील बदलामुळे वाढलेली डासांची उत्पत्ती, आदी कारणांमुळ राज्यभरात डेंग्यूने डोके वर काढले आहे. गत पाच वर्षात राज्यभरात डेंग्यूसदृश्य तापाचे १३ हजार ९८१ संशयीत रुग्ण आढळून आले. त्यापैकी १७५ लोकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
डासांची उत्पत्ती वाढल्याने मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारख्या आजारांनी शहरी आणि ग्रामीण भागातही डोके वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यावर्षी हिवताप विभागाने डेग्यूच्या ३५00 संशयीत रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी विभागीय प्रयोगशाळेकडे पाठविले. त्यापैकी २४ रुग्णांचा मृत्यू झाला.
डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करुन, डेंग्यू नियंत्रणासाठीच्या उ पाययोजनांचे प्रशिक्षणही दिले होते; मात्र तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आली नाही. डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून, आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब आहे.
डेंग्यू आणि मलेरियावर मात करायची असेल तर परिसर स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. पालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. डेंग्यू आणि हिवताप नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पुरेपूर काळजी घेत असल्याचे बुलडाणा जिल्हा हिवताप अधिकारी एस.के.वानखेड यांनी सांगीतले.
डेंग्यूसदृश्य रूग्ण
वर्ष संशयित रुग्ण मृत्यू
२0१0 १४८९ 0५
२0११ ११३८ २५
२0१२ २४२२ ७३
२0१३ ५४३२ ४८
२0१४ ३५00 २४